डान्सर्सनी डान्सर्सना घेऊन डान्सर्ससाठी बनवलेला चित्रपट असं वर्णन करता येईल असे काही सिनेमे गेल्या काही वर्षात बनू लागले. एबीसीडी, एबीसीडी2 हे त्या पठडीतले सिनेमे. आता त्याच यादीत आणखी एक सिनेमा येऊन पडतो आहे त्याचं नाव स्ट्रीट डान्सर 3. रेमो डिसूझा दिग्दर्शित हा सिनेमा हा पक्का डान्सर्ससाठी बनलेला सिनेमा आहे. विविध प्रकारचे डान्सर्स वेगवेगळ्या व्यासपीठांवर वेगवेगळे नाच करताना पाहणं म्हणजे डोळ्याचं पारणं फिटतं. म्हणजे, हा नाच आहे की कवायत असा प्रश्न पडतोच. पण एकदा याला डान्स मानलं तर मात्र खरंच तुफान नाच पाहायला मिळतो. पण सिनेमाला आवश्यक गोष्ट.. पटकथा मात्र या सिनेमा फारच अशक्त आहेत. गेला बाजार अशक्त कथेला सामाजिक संदेश देण्याचं ठिगळ या सिनेमात लावण्यात आल्यानं किमानपक्षी याला गोष्ट आहे असं म्हणता येते पण ती अशक्त आहे.

इंग्लंडमध्ये सहज आणि त्याच्या भावाचा डान्स ग्रुप आहे, त्याचं नाव स्ट्रीट डान्सर. तर तिथेच राहणाऱ्या पाकिस्तानच्या मुलांचा ग्रुपही आहे. त्याची कप्तान आहे इनायत. दोन्ही ग्रुपची ठसन आहे. ती वेळोवेळी.. शहरांच्या वेगवेगळ्या रस्त्यांवर नाचाच्या रुपाने दिसत असतेच. पण हा राग वाढत जातो. पण एक अशी गोष्ट घडते आणि हे दोन्ही ग्रुप नाट्यमयरित्या एकत्र येतात. त्यातून पुढे काय होतं.. ते कसं.. घडत जातं याची ही गोष्ट आहे.

उत्तम कोरियोग्राफर असलेला रेमो डिसूजाने हा सिनेमा लिहिला आहे आणि दिग्दर्शित केला आहे. नृत्याला केंद्रस्थानी ठेवून या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणूनच दर एका सीननंतर या सिनेमात डान्स परफॉर्मन्स येतो. पण अशक्त कथा, पटकथा आणि संवादांमुळे नृत्य पाहण्यापलिकडे आपण फार काही करू शकत नाही. उरला प्रश्न नृत्याचा तर वरूण, श्रद्धासारखे तगडे डान्सर आहेतच पण या जोडीला प्रभूदेवाही आहे. त्याचं पडद्यावर अवतरणं म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. सोबतीला उत्कृष्ट संगीत आहे. ठेका धरायला लावणारं संगीत आणि चकित करणारे डान्स परफॉर्मन्स कमाल आहेत. बाकी फार डोक्याला ताण न देता ते डान्स पाहात रहायचं.

पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत दोन स्टार्स. तुन्ही डान्सचे फॅन असाल तर हा सिनेमा पाहायला हरकत नाही. पण सिनेमा शोधायला जाल तर इथे हातात फार काही लागत नाही.