नागपूरः शासकीय कार्यालयात कुठलेही काम करण्यास विलंब होईल, विनाकारण चकरा माराव्या लागतात, कर्मचारी सहकार्य करत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र नागरिकांना भूमापन कार्यालयात कुठलीही अडचण आल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन भूमापन अधिकारी क्र. 3 स्वप्ना पाटील यांनी केले. तसेच कार्यालयात दलालांची मदत घेऊ नका, कर्मचाऱ्यांना भेटा वेळेत काम करुन देण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेल्या मिळकत पत्रिका या सर्व कामांसाठी वैध असून दलालांकडून ऑनलाइन मिळकत पत्रिका चालणार नाही. ऑफलाइन लागेल अशी नागरिकांची दिशाभूल करण्यात येते. मात्र ऑनलाइन डाऊनलोड केलेली मतपत्रिका सर्व कामांसाठी वैध असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले.


येथे मिळेल ऑनलाइन सुविधा


एप्रिल 2021 पासून संपूर्ण राज्यात नगर भूमापन क्षेत्रासाठी ऑनलाईन  प्रणाली सुरु करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व मिळकत पत्रिका ऑनलाईन उपलब्ध आहेत. मिळकत पत्रिकेवरील फेरफार प्रणाली ऑनलाईन झाली आहे. अभिलेखाच्या mahabhumi.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध पोर्टल फॉर लँड रेकॉर्ड सर्व्हिसमध्ये प्रिमियम सर्व्हिस अंतर्गत डिजीटल साईन सातबारा, आठ-अे, फेरफार  आणि मालमत्ता कार्ड या लिंकवरुन ऑनलाईन शुल्क भरुन डिजीटल साईन केलेली मिळकत पत्रिका डाऊनलोड करता येते. त्यापुढील पी.आर. कार्ड ॲपलिकेशन स्टेटस या लिंकवरुन मालमत्ता पत्रक फेरफार सद्यस्थिती तपासणी या पर्यायातून अर्जदारांना फेरफार प्रकरणांची स्थिती तपासता येते. 



पोहोच पावती घ्या


स्थिती तपासणीसाठी अर्जदार यांनी फेरफार प्रकरण कार्यालयात सादर केल्यानंतर अर्जदारांनी पोहोच प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. सदर पोहोच असलेला 15 अंकी क्रमांक नमूद करुन माहिती अर्जदार यांना प्राप्त करुन घेता येईल. ऑनलाईन डाऊनलोड केलेली मिळकत पत्रिका सर्व कामासाठी वैध आहे. डाऊनलोड केलेल्या मिळकत पत्रिकावरील 16 अंकी क्रमांकाचा वापर करुन शासनाच्या डिजीलॉकर याॲपमध्ये सिर मिळकत पत्रिका संग्रहित ठेवता येते.


चुका बुधवारी  करुन घ्या दुरुस्त


या संकेतस्थळावरुन पोर्टल फॉर लँड रेकॉर्ड सर्व्हिस  अंतर्गत फ्रि सर्व्हिस उपलब्ध करुन ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गत भूलेख  या लिंकवरुन सर्व ऑनलाईन मिळकत पत्रिका मोफत व केवळ पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्वांनी याचा अंवलंब करुन त्यांच्या ऑनलाईन मिळकत पत्रिका प्राप्त करावी. या ऑनलाईन मिळकत पत्रिकेत व हस्तलिखित मिळकत पत्रिकेमध्ये नाव, प्लॉट क्र., प्लॉट क्षेत्र अशा हस्तदोषाच्या चुका आढळून आल्यास दर बुधवारला कार्यालयीन वेळेत दुरुस्ती करुन घेता येईल. 
27 जुलै रोजी फेरफार अदालत


हेल्प डेस्क


पत्रिकेबाबतच्या ऑनलाईन प्रणालीत काही अडचण आल्यास  किंवा मिळकत पत्रिकेच्या बाबतीत अडचण आल्यास अर्जदारांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडे न जाता 27 जुलै रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीच्या दिवशी किंवा इतर वेळेस कामाच्या कार्यालयीन वेळेत कार्यालय प्रमुख, संबंधित साजाच्या परिरक्षण भूमापक अथवा कार्यालयाच्या हेल्प डेस्क यांच्याशी संपर्क साधावा. या फेरफार अदालतीस जास्तीत जास्त प्रतिसाद देवून उपस्थित राहावे, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी क्र.3 स्वप्ना पाटील यांनी केले आहे.