Exams in Vidarbha : विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता पाहता आजवर सर्व शाळांच्या सर्व परीक्षा (लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक) 23 एप्रिलपर्यंत होऊन त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असायची. मात्र नुकतच राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळेस परीक्षा घेण्याचा निर्णय घेत संपूर्ण राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षा 23 एप्रिलपर्यंत, आणि प्राथमिक शाळांच्या परीक्षा 25 एप्रिल पर्यंत घेण्यास सांगितले आहे. त्यानंतर तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची आहे. त्यामुळे 25 एप्रिलपर्यंत लेखी परीक्षा व त्यानंतर तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा आणि त्यानंतर पेपर तपासणी करून निकाल लावेपर्यंत किमान 15 मे उजाडणार आहे. विदर्भातील सर्व शाळा व्यवस्थापनांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जर शिक्षण विभागाच्या नव्या आदेशाप्रमाणे विदर्भातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालतील आणि त्यानंतर तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांना तीव्र उन्हात, जास्त तापमानाचा सामना करत मे महिन्यापर्यंत शाळेत यावे लागेल. तसेच निकाल लागता लागता 15 मे उजाडेल. त्यामुळे शिक्षण विभागाने एकाच दिवशी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्याचा अट्टाहास सोडावं आणि विदर्भात पूर्वी ज्या पद्धतीने 23 एप्रिलच्या आधीच सर्व परीक्षा (लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक) पूर्ण व्हायच्या, तशीच प्रक्रिया सुरू राहू द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे.
तर हेकेखोर अधिकाऱ्यांना मे महिन्यात विदर्भात पाठवा
दरम्यान, या मागणीसाठी महामंडळाने या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्रही पाठवले आहे. राज्य सरकार जर विदर्भातील शाळा व्यवस्थापनांची ही मागणी मान्य करणार नसेल तर शिक्षण विभागाच्या हेकेखोर अधिकाऱ्यांना मे महिन्यात विदर्भात शाळांची तपासणी करण्यासाठी पाठवावं, म्हणजे त्यांना विदर्भातील तीव्र उन्हाचा अंदाज येईल, अशी मागणी ही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे.
एप्रिल ते जून या काळात उष्णतेची लाट
IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. या दोन्ही भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा