Maharashtra Weather Update: राज्यात एकीकडे उन्हाचा भडका उडाला असताना दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. तर आज (1 एप्रिल) पासून पुढील काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain)अजून गडद होण्याची शक्यता आहे. तर आगामी काळात एप्रिल ते जून या कालावधीत भारतासह राज्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम मैदानी भागात उष्णतेची लाट अधिक दिवस टिकून राहू शकते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतीय हवामान विभागानं (Imd) या बाबत महत्वाची माहिती दिली असून या बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे. 

उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता

IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे. साधारणत: एप्रिल ते जून या काळात भारतात चार ते सात दिवस उष्णतेची लाट असते. तर राज्यात एप्रिल महिन्यात उन्हाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात एप्रिलमध्ये उन्हाळी पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे आंबा पिकाच्या मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली  जात आहे.

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहूसह कांदा पिकाला फटका

दरम्यान, हवामान विभागानं (Imd) दिलेल्या अंदाजा नुसार अकोल्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. मुर्तीजापुर तालुक्यातल्या निपाणा गावात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. काल (31 मार्च) रात्री आठ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि जवळपास 15 ते 20 मिनिट पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

 ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती

जळगाव जिल्ह्यात देखील हलक्या स्वरूपाचा अवकाळी पावसाने अचानक  हजेरी लावल्याने, शेतकरी तसेच चाकर मान्यानची मोठी धावपळ  उडाल्याचं पाहायला मिळाले आहे. या पावसाने एन काढणी सुरू असलेल्या ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती  व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात काल (31 मार्च)  सायंकाळ सुमारास हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. हवामान तज्ज्ञांनी देखिल पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार सायंकाळी हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. मात्र, या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला आहे.

हे ही वाचा