मुंबई: एकीकडे टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता जवळ जवळ निश्चित झाले आहे. परिणामी आजपासून एसटीची भाडेवाढ लागू झाली असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत 14. 95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली होती. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्याचा बोजा आता सर्वसामान्यांच्या खिशाला पडणार आहे.
दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी, सर्वसामन्यांच्या खिशाला झळ?
परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक झाली. बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एसटी महामंडळाने सुमारे 14.95 टक्के भाडेवाढ करण्याची मागणी केली होती, तर ऑटोरिक्षा आणि टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत 3 रुपयांनी वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ऑटोरिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये आणि किमान टॅक्सी भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये होऊ शकते. टॅक्सी आणि ऑटोसाठी शेवटची भाडेवाढ ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आली होती, परंतु याबाबत अधिकृत निर्णय झाला नसल्याचे अधिकारी म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे भाडेवाढ करणे गरजेचे असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी दिली होती.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची 'एबीपी माझा'ला माहिती!
मंत्रालयात नुकतीच प्राधिकरणाची बैठक पार पडली. यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो गृहमंत्रालयाचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव यांचा या बैठकीत समावेश असतो. काल म्हणजेच 23 जानेवारीला दुपारच्या सुमारात ही बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय झाला आहे की, तिला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली एसटी दरवाढीबाबत 14.95 टक्के इतकी वाढ झाली आहे. तर रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ ही एक फेब्रुवारीपासून लागू होणार असून ती 3 रुपयांनी वाढवली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सिएनजी, एसटीचे सुटे पार्ट, इत्यादी गोष्टींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षी ही दरवाढ अपेक्षित असते. मात्र मागील तीन वर्षापासून ही दरवाढ झालेली नाही. परिणामी ही दरवाढ करण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या