राज्यभरात दूध, भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संपकरी शेतकऱ्यांकडून तोडफोड करण्यात येत आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाने एसटीतून फळ, दूध आणि भाजीपाला नेण्यास बंदी घातली आहे.
राज्यभरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. संपकरी शेतकऱ्यांकडून भाजीपाला, दूध यांसारख्या वस्तू रस्त्यावर फेकून आंदोलन केलं जात आहे.
राज्यभरातील शेतकरी संपावर
राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाणार असल्याचं सांगितलं.
पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.
त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.
संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
- शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
- शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी.