नागपूर : जगात अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यसनी लोकांची संख्या वाढते आहे. अमली पदार्थविरोधात जनजागृती करण्यासाठी जागतिक पातळीवर 26 जून रोजी 'जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन' पाळण्यात येतो. नागपूर जिल्ह्यातही अमली पदार्थ विरोधी कडक कारवाईचे धोरण जिल्हा प्रशासनाने अंबलबिले आहे. 26 जूनला विशेष कार्यक्रमाचे आयोजन पोलीस व शासनातर्फे करण्यात येणार आहे.


अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबालाही याचा फटका बसतो. कारण, ज्या घरात अमली पदार्थांच्या आहारी गेलेली व्यक्ती असते, त्या घरात आर्थिक समस्यांसोबत मानसिक तणावाची स्थितीही निर्माण होते. त्या घराची व्यवस्थाच कोलमडून पडते. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात या संदर्भात कडक कारवाईचे धोरण अवलंबावे असे आवाहन उपायुक्त चिन्मय पंडीत यांनी केले आहे. तीव्र अमली पदार्थ अतिशय महाग असतात. त्यासाठी खूप जास्त खर्च करावा लागतो. व्यसनी व्यक्तींना नशेसाठी पैसे कमी पडू लागल्यानंतर ते पैशाची सोय करण्यासाठी चोरी- लूटमार असे गुन्हे करायला लागतात यातून सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होते, गुन्हेगारी वाढते, त्यामुळे याकडे वेळीच लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


प्रत्येक ठाण्यात वेगळी शाखा


विषय गुन्हेगारीशी संबंधित असल्याने स्वाभाविकच याचा संबंध पोलिसांशी येतो. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसात एक वेगळी शाखाच उघडण्यात आली आहे. नागपूर जिल्हयातील प्रत्येक पोलीस ठाण्याला याबाबत पोलीस उपायुक्त (गुन्हेशाखा) यांनी जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीतील निर्णयान्वये याबाबत सक्त सूचना केली आहे. अंमली पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो, त्यामुळे प्रश्न सामाजिक आरोग्याशीही जुळला आहे.


सामाजिक व आरोग्यविषयक जागृती-सेवेचे काम करणाऱ्या सामाजिक संस्थाही अमली पदार्थांच्या विरोधात जागृती करण्याचे काम करत असतात. अशा संस्थाही जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रमात मोठ्या संख्येत भाग घ्यावा. जनतेने या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घ्यावा, तसेच कळेल त्या स्तरावर अमली पदार्थ सेवनाचा विरोध स्वयंप्रेरणेने करावा असे आवाहन जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या वतीने पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांनी केले आहे.