धुळे : वॉटर कप स्पर्धेअंतर्गत पाणीदार झालेल्या गावांसाठी ‘सातत्य स्पर्धा’ ही नवी स्पर्धा येत्या काही महिन्यात सुरु करणार असल्याची माहिती पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी दिली. ते धुळ्यात एबीपी माझाशी बोलत होते.


‘सातत्य स्पर्धे’चा कालावधी एक वर्षाचा असेल. गवत, जंगल, माती आणि जल नियोजन या चार विषयांचा या स्पर्धेत समावेश असेल.

मानव, जनावरं, आणि शेती यांच्यासाठी उपलब्ध पाण्यात गरजा कशा पूर्ण होऊ शकतात, हा या स्पर्धेमागचा उद्देश असल्याचं सत्यजित भटकळ यांनी सांगितलं.

या स्पर्धेसाठी अभ्यासक्रम तयार करीत आहोत, यासाठी वेगळी फिल्म असेल, वेगळे गुणांकन असेल. पुढील काही महिन्यात आम्ही हे काम पूर्ण करु असा विश्वास सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केला.

पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या कार्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेसाठी सत्यजित भटकळ धुळ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना नव्या स्पर्धेची माहिती दिली.