अर्ध्या तासात थेट दर्शनाचे हजार रुपये, एका तासात मुखदर्शनाचे 500 असे वेगवेगळे पॅकेजेस होते! वडिलांनी त्यांना नमस्कार केला, आणि पांडुरंगाच्या दारात असलेल्या चोखामेळांच्या समाधीवर डोकं टेकवलं! आणि म्हणाले, माझा पांडुरंग या मंदिरातून कधीच निघून गेलाय!
लहान होतो, तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही, पण आता त्याचे संदर्भ लागत आहेत!
मुळातच आपल्याकडे देवादिकांची कमी नाही, त्यात नवनव्या देवांची भर त्यात पडू लागली आहे. आता परवाचीच गोष्ट घ्या! बीडच्या परळीमध्ये मुरुम उकरत असताना कुबेर प्रकट झाले... आता खोदकामात मूर्ती सापडली की तिचे काय होते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही!
बरं त्या मूर्तीच्या रक्षणासाठी तर एक नागदेवताही प्रगटली! जी मूर्तीसमोरुन जागची हलली नाही! आता या घटना, त्या मूर्तीला देवत्व बहाल करण्यासाठी पुरेशा होत्या! जणू मराठीतल्या देऊळ सिनेमाचाच प्लॉट!
बातमी वाऱ्यासारखी पसरली! सोशल मीडियाने त्याला मीठ मसाला लावला, आणि बघता बघता कुबेराच्या आशीर्वादासाठी तालुका लोटला!
स्वयंघोषित पुजाऱ्यांनी त्या मूर्तीला शेंदूर फासला, हार घातला, वन टाईम इनव्हेस्टमेंट म्हणून काही पैसेही ठेवले. मग काय साक्षात कुबेराच्या दर्शनासाठी रांगा लागल्या! तितक्यात काहींना शोध लागला, मूर्ती कुबेराची नसून विष्णूदेवाची आहे! हे कळताच पुजाऱ्यांचं नामस्मरणही बदललं... कुबेराय नम: असा जाप करणाऱ्यांना ॐ विष्णू देवाय नम: या जपावर येण्यासाठी सेकंदही लागला नाही!
बरं कुबेर देवाची निवृत्ती झाली आणि विष्णूदेव सेवेत आले... त्यामुळे रीघ आणखी वाढली! देवांना अर्पण करण्यासाठी कापूर, साखर, नारळ, अबिर गुलालाची दुकाने थाटली! गंडा दोऱ्यांनी दुकानांची तोरणे सजली! आणि विष्णुदेवाच्या नावाने कुबेराचा आशीर्वाद दुकानदारांना मिळाला!
रात्री देवाचा जागर सुरु झाला. लाऊड स्पीकर आला, पेंडॉल मारला गेला आणि काही दिवसांपूर्वी जिथे जेसीबी आणि पोकलेनसारख्या मशीनचा आवाज घुमत होता तिथे विष्णू सहस्त्रनामाचा जयघोष सुरु झाला!
या देवाच्या आख्यायिकाही तयार झाल्या आणि स्वयंभू विष्णुदेवाच्या मंदिराची मागणीही पुढे आली! ज्या जमिनीत देव प्रकटले, ती जमीनही एका मुस्लीम समाजाच्या माणसाची, पण त्यानेही मंदिरासाठी जमीन देण्याचे कबूल केले! त्यामुळे या मंदिराला सामाजिक सलोख्याचेही वलय निर्माण झाले! म्हणजे या मंदिराला ग्लॅमर मिळवून देणाऱ्या घटना तासागणिक वाढत होत्या!
पण तितक्यात माशी कुठे शिंकली कळले नाही! मूर्तीसमोरचा नाग प्रगटला नाही, तर आणून ठेवल्याची मोबाईल क्लिप व्हायरल झाली, आणि चर्चा सुरु झाली, हा कुणाचा खोडसाळपणा तर नसेल?
पुरातत्व खात्याने तर ही मूर्ती सूर्य देवाची असल्याचा निष्कर्ष काढला! शिवाय एखाद्या डोंगरावर आणि जमिनीपासून 40 फुटांवर मूर्ती मिळणे अशक्य असल्याचं मत मांडलं! शिवाय मातीचा पोत आणि मूर्तीचे स्वरुप यावरुन ही मूर्ती तिथे कुणी तरी आणून ठेवली असावी, असाही निष्कर्ष काढला गेला! म्हणजे आता नागही तसाच "आणला" गेला का?
पण देवभोळ्या माणसांना शास्त्रीय अभ्यासाद्वारे निरीक्षण नोंदवणाऱ्यांपेक्षा भक्ती महत्त्वाची वाटते! आणि त्याचं कारणही आहे! माणसाला, कायम एका अदृश्य शक्तीची गरज भासत आली आहे! कोणत्याही नकारात्मक घटनेचे खापर फोडण्यासाठी किंवा सकारात्मक घटनेचे श्रेय देण्यासाठी एक मूर्ती हवी असते! जी कधी बोलत नाही, भांडत नाही, रुसत नाही! जी सगळं ऐकून घेते, वाद घालत नाही! अलिकडच्या काळात एकटेपणा आलेल्यांसाठी तर देव म्हणजे कुटुंबाचा सदस्यच! जो निरुपद्रवी आहे!
पण याच देवभोळ्यांचा पुरेपूर फायदा घेणारे काही व्यवहारी माणसंही या जगात आहेत! अमुक केलं नाही तर देव कोपेल, तमुक केलं नाही तर अनर्थ घडेल, अशी भीती घातली जाते! आणि मग सुरु होतो देवाचा बाजार! देवाच्या भीतीचा बाजार! जसा आता परळीच्या डोंगरावर सुरु आहे!
क्षणभर कल्पना करा! परळीच्या या देवाचे भले मोठे मंदिर उभे राहिले आहे.... मंदिरसमोर देवाचे रक्षण करणाऱ्या नागाची 25 फुटी भव्य मूर्ती साकारली आहे! दुष्काळी भागातल्या या मंदिरामुळे चैतन्य निर्माण झाले आहे! पूजा सामानाच्या दुकानांमुळे आर्थिक उलाढाल वाढली आहे! मंदिराच्या समितीची स्थापना झाली आहे! त्यावर वर्णी लागण्यासाठी निवडणुकीत अमाप पैसा ओतला जात आहे! आमदार आणि खासदार फंडातून मंदिरासाठी निधी मंजूर होत आहे! मंदिरात रोज अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे! देव स्वयंभू असल्याने नवसाला पावणारा आहे अशीही ख्याती पसरली आहे! आणि त्यामुळे पंढरपूरसारखीच रांग या देवासमोर लागली आहे!
कल्पना करण्याची गरज नाही, येत्या काही वर्षात आपण हे प्रत्यक्षात अनुभवणार आहोत! आणि तेव्हाही काही जण रांगेत उभे असतील, काही जण दर्शन न घेताच परतीला लागलेले असतील!