कोल्हापूर : बारावीनंतर पाच वर्षाच्या कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी कोल्हापुरात आज ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र म्हणून आणलेल्या आधार कार्डची मूळ प्रत नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले.

कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पन्नासहून अधिक विद्यार्थी असल्याने त्यांना या घोळामुळे परीक्षेला मुकावं लागलं. तर अनेक विद्यार्थिनींना रडूही कोसळलं. यामुळे परीक्षा केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी पालकांनी केली आहे.

आधार कार्ड नसल्यामुळे विविध गोष्टींचा लाभ नाकारला जातो, अशा बातम्या तुम्ही कायम पाहिल्या असतील. मात्र आधार कार्ड होतं, पण त्याची मूळ प्रत नव्हती म्हणून विद्यार्थ्यांना चक्क परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातून समोर आला आहे.

एकीकडे केंद्र सरकार सांगतं, की आधार कार्ड नसेल, तरीही प्रत्येक ठिकाणी गरजूंना लाभ द्या. मात्र, दुसरीकडे केवळ आधार कार्डची मूळ प्रत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची संतापजनक घटना घडली.

संबंधित बातमी :

आधार नसेल तरीही गरजूंना लाभ द्या : रविशंकर प्रसाद