शेतकऱ्यांचा समूह करुन शेतातच सौर उर्जा निर्मिती : बावनकुळे
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2017 07:51 AM (IST)
अहमदनगर : विजेची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जेवर भर दिलाय. शेतकऱ्यांच्या शेतावरच सौर उर्जा निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे समूह करुन वीज निर्मिती केली जाणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. राळेगणला ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीनंतर बोलत होते. राळेगणच्या अॅग्रीकल्चर सोलर फिडरचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. या योजनेचं मुख्यमंत्री सोलर फिडर योजना नामकरण करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळणार असून युनिटला केवळ एक रुपया तीस पैसे द्यावे लागणार आहेत. सद्यस्थितीत वीज निर्मिती करुन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सहा रुपये खर्च येतो. त्यामुळे गावातील वीज गावात तयार करण्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.