Student Protest : शिक्षण घेत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी शाळेची अवस्था नीट नसते, तर कधी शाळेला जाण्यासाठी रस्ते नसतात, तर काही ठिकाणी शिक्षकांची कमी असते. अशीच एक  सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील टाकळी गावातील जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेला गेल्या अनेक वर्षापासून रस्ता नाही. त्यामुळं आज या शाळेच्या चिमकुल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या रस्त्यासाठी थेट गनिमी कावा करत चालत्या गाडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांना निवेदन दिले आहे.  




नेमकं घडलं काय?


राजकीय नेत्यांना आपल्या प्रश्नासाठी आंदोलक अडवतात हे नेहमीच पाहायला मिळते. मात्र शाळेला रस्ता मिळवण्यासाठी पोलिसांनी अडवल्यावर पळत गाडीपर्यंत जावून निवेदन देणारे चिमुरडे कधी पाहिले नसतील. या चिमुरड्या आंदोलकांनी थेट शरद पवार यांना निवेदन दिले आहे. माढा तालुक्यातील टाकळी गावातील जिल्हा परिषद शाळेला गेल्या अनेक वर्षापासून रस्ता नाही. या प्राथमिक शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना चिखलातून शाळेत जावे लागते. यामुळेच आज अखेर या मुलांनी खासदार शरद पवार यांना कापसेवाडी येथे निवेदन देण्यासाठी कार्यक्रमाच्या रस्त्यावर बोर्ड घेऊन थांबले होते. मात्र पोलिसांनी या मुलांना भेट नाकारल्याने ही मुले निराश झाली. मात्र, त्यांनी रस्त्यासाठी आपली जिद्द सोडली नाही. कार्यक्रम संपवून पवारांच्या गाडीचा ताफा परत निघाल्यावर पोलिसांची नजर चुकवून यातील चौथीमध्ये शिकणाऱ्या अमित कळसाईत या मुलाने शरद पवार यांची गाडी गाठली. यावेळी अभिजित पाटील हे गाडी चालवत होते आणि शरद पवार शेजारी बसले होते. मुलगा गाडीमागे पळत असल्याचे पाहून अभिजित पाटील यांनी गाडी थांबवली आणि या चिमुकल्यांनी आपले निवेदन शरद पवार यांच्या हातात दिले. त्यांनतर पोलिसांनी या चिमुरड्याला बाजूला घेतल्यावर ताफा गेला.


आम्हाला पोलिसांनी भेटू न दिल्यानं केला गनिमी कावा


आम्हाला पोलिसांनी भेटू न दिल्यानं मी गनिमी कावा करुन पवार साहेबांना आमच्या शाळेच्या रस्त्याचे निवेदन दिल्याचे छोट्या अमितनं सांगितलं. यानंतर शरद पवार यांना हेलिकॉप्टरपर्यंत सोडून परत आल्यावर अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या सूचनेनुसार या बाळगोपलांची भेट घेतली. साहेबांनी तुमच्या शाळेला रास्ता देण्याविषयी मला सांगितल्याचे या मुलांना सांगितले. मात्र, आपले प्रश्न मांडण्यासाठी गनिमी कावा करुन आपले काम साधणाऱ्या छोट्या अमितचे  सर्वजण कौतुक करत आहेत.


सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील कापसेवाडीत कृषीनिष्ठ परिवाराचे प्रमुख नितीन कापसे यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी शरद पवार हे कापसेवाडीत आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. द्राक्ष उत्पादकांसह, केळी, टोमॅटो उत्पादकांचे विविध प्रश्न यावेळी शरद पवारांजवळ शेतकऱ्यांनी मांडले आहे. तसेच शरद पवारांनी या प्रकरणी लक्ष घातलून पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


दबाव टाकणाऱ्यांची कागदपत्रं मला द्या, त्यांचा बंदोबस्त करतो; शरद पवारांचा रोख नेमका कोणाकडं?