सोलापूर : वाहतूक नियमांचे अनेकांकडून पालन होत नाही, त्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठे दंड आकरण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच झालाय. मात्र याच कडक नियमांचे दाखले देत सर्वसामान्यांची लूट कशा पद्धतीने सुरू आहे याचा प्रकार सोलापुरात समोर आलाय. सोलापुरातील प्रमुख चौकांपैकी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ भर रस्त्यात ट्राफिक पोलिस चिरीमिरी घेताना कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. आज दुपारी एक ते दोनच्या सुमाराची ही घटना आहे.
सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथे नेहमीच ट्राफिक पोलिस तैनात असतात. आज दुपारी एका वाहन चालकाला येथे उपस्थित असलेल्या दोघांना ट्राफिक पोलिसांनी थांबविले. नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांना कडक कारवाईचे दाखले देण्यात आले. मात्र नंतर चिरीमीरी घेऊन या वाहन चालकाला सोडून देण्यात आले. आपल्याला कोणी पाहू नये यासाठी हात मागे घेत या पोलिसांनी चिरमिरीची रक्कम स्वीकारली. मात्र ही घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेरात टिपली.
व्हिडीओ व्हायरल
पोलिसांनी चिरीमिरी घेताना शूट करण्यात आलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. पोलिसांकडून देखील या संदर्भात चौकशी सुरु करण्यात आलीय. व्हिडीओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
तरीही लूट सुरूच
वाहतुकीचे नियम मोडले तर या पूर्वी ट्राफिक पोलिस पावती फाडत असत. त्यासाठी रोख रक्कम घेतली जात असे. हे पैसे घेताना चिरीमिरी देऊन वाहन चालक मोठ्या दंडातून सुटका तर करुन घ्यायचे. मात्र, यामुळे मोठा भ्रष्टाचार होत होता. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागात मोठे बदल केले. वाहतूक विभागाचा कारभार ऑनलाईन झाला, नंतर डिजीटल स्वरुपात ग्राहकाच्या घरी पावती जायला लागली, पैसेही थेट वाहतूक विभागाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. यामुळे मोठा भ्रष्टाचार थांबला. पण, असं असलं तरी ट्राफिक विभागातील काहींची ही चिरीमिरी घ्यायची सवय काही सुटली नाही. त्यामुळेच मोबाईलचा फक्त धाक दाखवून वाहनचालकांकडून चिरीमिरी घेणं सुरुच आहे. सोलापुलातील घटनेने हेच पुन्हा एकदा दाखवून दिलंय.
महत्वाच्या बातम्या