Tomato Price : सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब (Modnimb) ही मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून पश्चिम बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहारसह देशभरातील विविध राज्यात टोमॅटो पाठवले जातात. मात्र, सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने मोडनिंबच्या बाजारपेठेतून होणारी निर्यात बंद झाली आहे. सध्या देशात टोमॅटोला भाव नसल्यानं जिथं 500 रुपये किलोने टोमॅटो विकला जातो, त्या पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश (Bangladesh) या देशांच्या सीमा उघडण्याची मागणी आता शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.
उत्पादन खर्च वाढला असताना अपेक्षीत दर मिळत नाही
सध्या टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. उत्पादन चांगल असतना दर मात्र, योग्य मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. सध्या टोमॅटोला किलोला 8 ते 10 रुपयांचा दर मिळत आहे. मात्र, उत्पादन खर्च पाहता हा दर परवड नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. तसेच सध्या सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्याचा फटका देखील टोमॅटो उत्पादनावर झाला आहे. पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. राज्यातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातून असंख्य शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी मोडनिंब बाजारपेठेत येत असतात. मोडनिंब ही मोठी बाजारपेठ असून दिल्ली राजस्थान, गुजरात, कोलकाता अशा असंख्य ठिकाणी माल पाठवण्यासाठी व्यापारी या ठिकाणी येतात. परंतू, सध्या माल मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी किमान दहा ते बारा रुपयांचा खर्च येत आहे. तर आठ ते दहा रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आर्थिक फटका बसत आहे.
टोमॅटो निर्यातीसाठी केंद्र सरकार मदत का करत नाही? शेतकऱ्यांचा सवाल
सध्या देशात टोमॅटोला चांगला दर मिळत नाही. मात्र, बाहेरच्या देशात टोमॅटोला सध्या सोन्याचा भाव मिळत आहे. असे असतानाही टोमॅटो निर्यातीसाठी केंद्र सरकार मदत का करत नाही? असा सवाल टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि व्यापारी करत आहेत. सध्या पाकिस्तानात पूरस्थिती असल्यानं इथे कोणताच शेतमाल पिकत नाही. सध्या पाकिस्तान टोमॅटोला 500 रुपये किलो एवढा दर मिळत असताना केंद्र सरकारने देशातील टोमॅटो बाहेर पाठवण्यास परवानगी द्यावी अथवा या देशातील बॉर्डर उघडाव्यात अशी मागणी मनसेचे जिल्हाप्रमुख प्रशांत गिड्डे यांनीही केली आहे. केंद्र सरकारनं टोमॅटो निर्यातीस परवानगी दिल्यास अडचणीत आलेल्या टोमॅटो उत्पादकांना चार पैसे मिळू शकतील असा दावा टोमॅटो अडती आणि व्यापारी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: