सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)  यांनी आपल्या कार्यकाळात सोलापूरसाठी (Solapur News) काही महत्वाचे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये दक्षिण सोलापुरातील टाकळी या ठिकाणी बीएसएफ (BSF) जवानसाठी प्रशिक्षण केंद्र, अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या ठिकाणी शस्त्र सीमा बल केंद्र, बोरामणी या गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ असे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून जमिनी खरेदी करण्यात आल्या. मात्र हे तीन मोठे प्रकल्प अद्याप ही रखडलेलेच आहेत. 


देशभरातील सीमा सुरक्षा बलाच्या अर्थात बीएसएफ जवानांची सोय व्हावी, स्थानिक तरुणांना बीएसएफमध्ये संधी मिळावी, या हेतूने 2014 साली सोलापुरात बीएसएफ ट्रेनिंग कॅम्प उभारण्यात आले होते.  मात्र जवळपास दहा वर्ष पूर्ण होते आले तरी अद्याप हे प्रकल्प पूर्णपणे रखडलेलेच आहे. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने सोलापुरातील टाकळी या ठिकाणी जवळपास 32 हेक्टर जमिनीवर बीएसएफ ट्रेनिंग सेंटर उभे करण्यात आले. या ठिकाणी 95 कॉर्टर्स, प्रशासकीय इमारत, ट्रेनिंग सेंटर हे ही उभारण्यात आले.  जवळपास एक हजार सैनिकांनी प्रशिक्षण देता येईल यासाठी सर्व व्यवस्था उभी करण्याचे आश्वासन या ठिकाणी देण्यात आले होते. मात्र मागच्या दहा वर्षात प्रत्यक्षात एका ही जवानाला इथं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही.


दहा वर्षांनंतरही प्रकल्प रखडलेलेच


केवळ बीएसएफ ट्रेनिंग कॅम्पच नाही तर 2014 सालीच अक्कलकोटच्या हन्नूरमध्ये सशस्त्र सीमा बलसाठी देखील कोट्यावधी रुपये खर्चून जमीन संपादित करण्यात आली.  मात्र मागच्या दहा वर्षात प्रत्यक्षात येथं काहीही झालं नाही. या आधी सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरमणी गावात जवळपास दीड हजार एकर जमीन संपादित करण्यात आली.  मात्र मागच्या दहा वर्षात येथे एअरपोर्ट ही नाही आणि विमान ही नाही. 


सोलापूरचा विकास खुंटल्याची टीका


उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणारा शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. एकेकाळी या सोलापूरला दक्षिण भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जायचे . मात्र मागील काही वर्षात सोलापूरचा विकास खुंटल्याची टीका वारंवार होतेय. त्यामुळे राजकीय अनास्था आणि लालफितीच्या कारभारात अडकलेल्या या प्रकल्पाचा सोलापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी वापर होणे गरजेचे आहे.


हे ही वाचा :