सोलापूर : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन (Solapur- Dhule Highway) धावणाऱ्या एसटी बसला (ST Bus) अपघात झाला आहे. या एसटी बसचे मागचे चाकं निखळले. या बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहे. सोलापुरातील उळे-कासेगाव येथे हा थरार अनेक प्रवाशांनी आज अनुभवलाय. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून येथून ही एसटी बस नांदेडकडे निघाली होती. या बसमधून किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोलापुरातील उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळल्याने हा अपघात झाला. ही बस तिरकी होऊन रस्त्यावरच एसटी बस पलटी झाली. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.सर्व जखमींना जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर 15-20 मिनिटात झाला अपघात
सोलापूर डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हा अपघात झाला आहे. नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचे प्राण वाचले. बस थांबल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या घटनेमुळे राज्य परिवहन महमंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही एसटी बस डेपोतून बाहेर पडताना तपासण्यात आली नव्हती का? असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात आला आहे.
आठवड्याभरातील दुसरी घटना
एसटीच्या अपघाताची ही आठवड्याभरातील दुसरी घटना आहे. 21 नोव्हेंबर रोजी (मंगळवारी) दुपारी सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने एसटी थेट रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले होते. सोलापूर - तुळजापूर रोडवरील कासेगाव जवळ हा अपघात झाला होत. या एसटी बस मधील प्रवासी पुणे कर्नाटक आणि मराठवाड्यातील होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. या अपघाताने काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मुक्का मार लागला होता.
एसटी महामंडळाच्या अनेक बस भंगार झाल्या आहेत. मात्र तरीही त्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील (Gadchiroli) लालपरीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होता. या व्हिडीओमधील एसटीचा पत्रा हा हवेत उडाला तरी या एसटीचा (ST) चालक ही बस भरधाव वेगाने चालवत होता. सर्वसामान्यांचं प्रवासाचं हक्काचं साधन म्हणजे, लालपरी. मात्र त्याच लालपरीमधून प्रवास करणं प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे.