Solapur : सोलापूरात गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. सोलापुरातल्या होटगी-कुंभारी रोडवरील गणेश मंदिरातील गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचा व्हिडिओ मंगळवारपासून व्हायरल होतोय. हा दैवी चमत्कार असल्याची भावना मनात ठेवत या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहुयात...
आजपर्यंत माणसाला रडताना आपण पाहिलं असेल. मात्र जर तुम्हाला चक्क देवाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचे कोणी सांगितलं तर? सोलापुरातल्या कुंभारी-होटगी रोडवरील गणेश मंदिरातल्या गणपतीच्या डोळ्यात अश्रू येत असल्याचा व्हिडीओ मंगळवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाहता पाहता व्हिडीओ अनेकांच्या मोबाईलमध्ये पोहोचला आणि भाविकांची गर्दी या मंदिरात झाली.
रस्त्याच्याकडेला मंदिर असल्याने एरवी जातायेता दर्शन घेणारे भाविक आता थांबू लागले. भाविकांच्या सोयीसाठी आता छोटसं मंडप ही इथं उभारण्यात आलं आहे. प्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गणेशाच्या डोळ्यातून येणारं हे अश्रू लोकांना दैवी चमत्कार वाटू लागलेत. मात्र ही अंधश्रद्धा असून लोकांनी यावर विश्वास ठेवू नये असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केलं आहे. दरम्यान, देवाच्या डोळ्यातून पाणी येताना दिसत जरी असलं तरी यामागे शास्त्रीय कारण काय हे देखील तपासायला हवं. देवावर श्रद्धा जरी असली तरी अंधश्रद्धा नसावी. बुद्धीची देवता असलेल्या गणरायनं लोकांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना, असं यशवंत फडतरे यांनी सांगितलं.
''सोलापूर शहरावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांनी जवळपास बाराशे वर्षांपूर्वी शहराच्या सर्व बाजूला अष्टविनायकांची स्थापना केली होती. त्यातील दुसरे गणपती म्हणजे हे बेनक गणपती आहे. काल पूजा करत असताना पुजाऱ्यांना देवाच्या डोळ्यात अश्रू असल्याचे लक्षात आले. कालपासून हे अश्रू सुरूच आहेत. याआधी 1995 साली अशाच पद्धतीचा प्रकार घडला होता अशी आमची माहिती आहे.'' अशी प्रतिक्रिया या परिसरातील स्थानिक असलेले महेश खसगे यांनी दिले.
''मी चतुर्थीला या गणपतीच्या दर्शनाला येत असते. जागृत मंदिर असल्याने या ठिकाणी बोललेले नवस पूर्ण होतात अशी माझी श्रद्धा आहे. कालपासून देवाच्या डोळ्यात अश्रू असल्याची माहिती मला मिळाली होती. आज मी स्वतः आल्यानंतर देखील देवाच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे चित्र पाहायला मिळालं.'' अशी प्रतिक्रिया सोलापूर शहरातून दर्शनासाठी आलेल्या भाविक अनिता पाटील यांनी दिली.
दरम्यान हा संपूर्ण प्रकार कळाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुवाबाजी विरोधी पथक या संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाऊन पाहणी केली. तसेच हा संपूर्ण प्रकार खोटा आहेत. जमलेली गर्दी ही अफवांमुळे झालेली आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. परिसरातील जागा लुबाडायची असल्याने भोंदू बाबांकडून हा प्रकार सुरू असल्याची प्रतिक्रिया बुवाबाजी विरोधी पथक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत फडतरे यांनी दिली.