Solapur Rain Updates : सोलापुरातील हिप्परगा तलाव (Hipparga Lake) ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावाचे पाणी शेजारच्या घरांमध्ये शिरलं आहे. पाणी घरात शिरल्यामुळं लोकांवर घरं सोडून जाण्याची वेळ आली आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणचे तलाव, नदी नाले पूर्णपणे भरले आहेत. सोलापुरात देखील हीच परिस्थिती आहे. सोलापूर शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हिप्परगा तलावात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे. याचा फटका शेजारी राहणाऱ्या लोकांना बसलाय. तलावाशेजारी राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे.




दरवर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना आपली घर सोडून दुसरीकडं जावं लागतं


मागील अनेक वर्षांपासून हे लोक त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे, स्थानिक आमदारांकडे मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कोणाही लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये या लोकांना आपली घर सोडून दुसरीकडं स्थलांतरित व्हावं लागतं. जवळपास 40 घरांमध्ये सध्या पाणी शिरल्यामुळं या सर्व कुटुंबांना आपली घरे सोडावी लागली आहेत. अजून एक दोन दिवस पाऊस पडल्यास उरलेल्या दहा ते पंधरा कुटुंबांना देखील आपली घरे सोडावी लागणार आहेत. 




आजपर्यंत आमचा कोणी विचार केला नाही


आम्ही गेल्या 10 वर्षापासून इथे राहत आहोत. आजपर्यंत आमचा कोणी विचार केला नाही. पाणी आलं की आम्ही घरं सोडून जात आहोत. मतदान आले की नेते आमच्याकडे येतात, मतदान झालं की परत ते येत नाहीत अशी माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळं राहायला आम्हाला घरकूल मिळावं, जागा मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या पाण्यात साप, विंचू आहेत. त्यामुळं भिती वाटत असल्याची माहिती नागरिकांना दिली. आत्तापर्यंत आम्हाला एवढा त्रास झाला नाही, पण मागच्या दोन तीन वर्षात आम्हाला जास्त त्रास होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. महापालिकेने आणि सरकारनं याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, कारण दिवसेंदिवस धोका वाढत आहे. त्यामुळं आमच्यासाठी पर्यायी मार्ग द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जवळपास 40 कुटुंबाचे स्थलांतर झाले असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरवर्षी हीच स्थिती आहे. जीव मुठीत धरुन आम्हाला या ठिकाणी राहावं लागत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: