पुणे : किल्ला चढताना 17 वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्यावर घडली आहे.  शुभम प्रदीप चोपडे (वय 17)  असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.  बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात शिकत असलेला शुभम भोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर येथे ट्रेकिंग करण्यासाठी गेला होता. किल्ला चढत असताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 


शुभम हा शारदाबाई महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत होता. आज सकाळी बारामतीहून किल्ले रायरेश्वर येथे विद्यालयातील 46 विद्यार्थी आणि शिक्षक ट्रेकिंगसाठी गेले. सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास  ट्रेक करताना अर्ध्या वाटेत अचानक  छातीत दुखायला लागले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खाली नेण्यात आले.  शुभमला जवळच असणाऱ्या प्राथमिक केंद्र अंबवडे तालुका भोर या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले होते.  मात्र उपचारापूर्वीच शुभम याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शुभम हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंब्रट गावचा मूळ रहिवाशी असून बारामतीत तो शिक्षणासाठी आला होता. त्याच्या या मृत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे.


ट्रेकिंगला जाताना काळजी घ्या...


अलिकडे ट्रेकिंगची   फारच क्रेझ बघायला मिळते. खासकरुन पावसाळ्यात अनेकजण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करत असतात.पण ट्रेकिंगला  जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. फिजिकली फिट राहणंही गरजेचं आहे. त्यासाठी फिरायला जाण्यापूर्वी व्यायाम करा. तसेच आणखीही काही व्यायाम केल्यास तुम्हाला ट्रेकिंगला जाताना अडचण येणार नाही.


संबंधित बातम्या :