Nashik Trakkers Death : नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील हडबीची शेंडी डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोघांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झालाय. अनिल वाघ, मयूर मस्के अशी मृतांची नावं आहेत. तर प्रशांत पवार असं जखमीचं नाव आहे. उर्वरित 12 जणांना स्थानिकांनी सुखरुप खाली उतरवलं आहे.
शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे दहा फूट खाली पडल्यानं जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण जखमी झाला आहे. प्रस्तरारोहण करणारे इतर 12 जण सुखरूप आहेत. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवलं आहे.
अहमदनगर येथील असलेले इंद्रप्रस्थ टेकर्स या ग्रुपचे एकूण 15 सदस्य हे मनमाड शहराजवळ असलेल्या हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. या ग्रुपमध्ये 8 मुली तर 7 मुलं होती. यातील मुलांमध्ये दोन जण सराईत ट्रेनर होते. सकाळी शेंडीच्या डोंगरावर पायथ्यापासून चढाई करण्यास सुरुवात केली होती. यातील मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ या दोघांनी ग्रुपमधील सर्वांची वर चढण्यासाठी असलेल्या जुन्या बोल्डिंगवर रोप लावला होता. रोपद्वारे सर्वजण सुखरूप शेंडीच्या डोंगरावर चढले. सर्वांनी वर चढल्यावर आंनद व्यक्त केला. मनसोक्त फोटो काढले. परतीच्या मार्गावर असताना यातील 8 मुली आणि 4 तरुण खाली उतरले. मात्र पाठीमागे थांबलेले दोघे ट्रेनर बोल्डिंगमधून रोप काढत असताना वरचे बोल्डिंग दगड ठिसूळ असल्यानं सटकलं.
बोल्डिंग सटकल्यामुळे ट्रेनर असलेले मयूर दत्तात्रय म्हस्के, अनिल शिवाजी वाघ हे दोघे डोंगरावरून खाली पडले. तर यांच्यासोबत असलेला प्रशांत पवार हा तरुण देखील जखमी झाला. हे दोघे खाली पडत असताना डोंगरावर जाणाऱ्या काही व्यक्तींनी बघितलं. त्यांनी तात्काळ फोन फिरवत रापली, कातरवाडी येथील तरुणांना बोलावून घेतलं. अपघात झाल्याचं लक्षात येताच सदर गावातील आणि मनमाड शहरातील तरुण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करत यातील एका मृताला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणलं. तर दुसऱ्या व्यक्तीला अंधार पडल्यावर सदर मृत तरुणाला शोधण्यात यश आलं. तिथून मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. जखमी प्रशांत पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी पाहा फक्त एबीपी माझा लाईव्ह