सोलापूर : गावातील क्रिकेट स्पर्धेत खेळताना गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विक्रम क्षीरसागर ( वय 35) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. चेंडू लागल्यानंतर विक्रम याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल कण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. विक्रम नेपातगाव या टीमकडून फलंदाजी करत होता. गोलंदाजने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने हा चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला आणि तो मैदानातच कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना विक्रम याचा मृत्यू झाला.
पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नेपतगाव येथील टीम सहभागी झाली होती. विक्रम क्षीरसागर या टीमचा कर्णधार होता. या हाफ पिच बॉल स्पर्धेचे उद्घाटन 4 ऑगस्ट रोजी झाले होते. पहिल्याच दिवशी नेपतगाव टीमने सामना जिंकल्यानंतर 6 ऑगस्ट रोजी दुसरा सामना आंधळगाव येथील संघासोबत सुरू होता.
कप्तान असणाऱ्या विक्रमला खेळण्यापूर्वी थोडे अस्वस्थ वाटत होते आणि यातच तो खेळायला आला. कायम फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या विक्रमला पाहिले तीन चेंडू खेळता आले नाहीत आणि चौथा चेंडू त्याच्या गुप्तांगाला लागला. दरवेळी गार्ड सारखे संरक्षक साधने वापरणाऱ्या विक्रमने त्यादिवशी ते वापरले नाहीत आणि त्याला जीव गमवावा लागला.
चेंडू लागल्यावर तो चालत मैदानाबाहेर देखील चालत गेला. पुढची काही षटके त्याने मित्रांसोबत मैदानात बसून पहिली. पण नंतर त्याला जाणवू लागल्यामुळे त्याला आधी तावशी येथे आणि नंतर पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत बोलत असलेल्या विक्रमाची शुद्ध उपचार सुरू असताना गेली आणि इथेच त्याचा शेवट झाला.
डाळिंब बागांच्या छाटणीचे काम करून उपजीविका करणाऱ्या विक्रमला पहिल्यापासून क्रिकेटचे वेड होते. मात्र, या वेडातच त्याला जीव गमवावा लागला. आज त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
महत्वाच्या बातम्या