Yavatmal News Update : यवतमाळमधील घाटंजी शहरातील एका व्यावसायिकाला नक्षलवाद्यांनी 50 लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास कुटुंबातील सदस्याला जिवे मारू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी  घाटंजी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्राच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आलीय.  


यवतमाळ जिल्ह्यात काही तालुके नक्षलग्रस्त होते. परंतु, अनेक वर्षांपासून नक्षलग्रस्त कारवाया झाल्या नाहीत. त्यामुळेच शासन दप्तरी असलेले जिल्ह्यातील नक्षलवादग्रस्त तालुके रद्द करण्यात आले. परंतु, गडचिरोलीत नक्षल दलमच्या कमांडरने पत्र पाठवून घाटंजी शहरातील व्यावसायिकाला 50 लाख रुपयांची  खंडणी मागितल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. खंडणी दिली नाही तर परिवारातील सदस्याला जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. 


घाटंजी येथील एका व्यावसायिकाला नक्षली कमांडरच्या नावे 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी पत्र आले आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. या पत्राने घाटंजी शहरात आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ढवळे यांना 2 ऑगस्ट रोजी पोस्टाद्वारे लाल रंगाचा लिफाफा आला. त्यातील पत्र वाचून ढवळे यांना धक्काच बसला. या पत्रात, 'मी गडचिरोली नक्षल दलम कमांडर क्र. 38 असून मला 50 लाख रुपये द्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारू', अशी धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी अखेर 4 ऑगस्ट रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हे पत्र हिंदी भाषेत लिहिले आहे. 


काय म्हटले आहे पत्रात?
"तुम्हाला लाल सलाम, तुम्ही मला 50 लाख रुपये द्या. याकडे कानाडोळा केल्यास आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारु. खंडणीची रक्कम 12 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता उमरी ते करंजी मार्गापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हनुमान मंदिराजवळील दरग्याच्या मागे आणून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 


दरम्यान, या पत्रामुळे व्यावसायिक कुटुंबीय भयभीत झाले आहे. हे पत्र कोठून आले? कोणी लिहिले? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. व्यावसायिकांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.