Solapur News : सोलापूर (Solapur) महावितरण (Mahavitaran) कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्याला आणि वायरमनला लाच (Bribe) घेतल्याप्रकरणी तब्बल वीस वर्षानंतर शिक्षा ठोठवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सोलापूर सत्र न्यायालयाचा (Solapur Session Court) निर्णय रद्द करत आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये अभियंता बाबुराव म्हेत्रेला एका वर्षाची, तर वायरमन इलाही शेख याला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच म्हेत्रेला दहा हजार रुपयांचा आणि शेख याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.


काय आहे प्रकरण?


हे प्रकरण 2003 मधील आहे. या प्रकारणातील तक्रारदार दुकानदाराला विजेचे बील (Electricity Bill) सुमारे 7 हजार रुपये आले होते. त्यावेळी दुकानदाराने सोलापूरच्या महावितरण कार्यालयात तक्रार केली. यावेळी आरोपी अभियंता म्हेत्रे आणि वायरमन इलाही शेख यांनी दुकानाची पाहणी करुन चुकीची वायरिंग झाली असल्याचे सांगत वीज कनेक्शनचं कापले. तक्रारदाराने वीज कनेक्शन पुन्हा सुरु करण्याची विनंती केली असता म्हेत्रे याने पाच हजार रुपये, तर शेख याने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत या दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau) तक्रार केल्याने म्हेत्रे आणि शेख या दोघांना एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. या दोन्ही आरोपींना लाच घेताना अटक झाली होती. 


पुराव्याअभावी सोलापूर सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता


न्यायाधीश एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकारच्या अपील याचिकेवर सुनावणी झाली.या दोघांविरोधात सोलापूर विशेष सत्र न्यायालयात खटला चालला. पण सोलापूर सत्र न्यायालयाने 17 जानेवारी 2004 रोजी या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर शासनाच्यावतीने उच्च न्यायालयात या संदर्भात अपील दाखल करण्यात आलं होतं.


घटना घडल्याच्या 20 वर्षांनंतर दोन्ही आरोपींना शिक्षा


यात निकाल देताना सोलापूर सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाने रद्द करत दोन्ही आरोपींना घटना घडल्याच्या वीस वर्षानंतर शिक्षा सुनावली  आहे. न्यायालयाने म्हेत्रेला एक वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसंच इलाही शेखला सहा महिन्यांची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड न्यायालयाने सुनावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास या दोघांना अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.


हेही वाचा


लाच घेताना किंवा कोणत्याही गुन्ह्यात पकडलं तरी नावं अन् फोटो छापू नका; अधिकारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!