Pandharpur Vithoba Mandir:  पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आता सामान्य विठ्ठल भक्तांना सेवेकरी म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या विठ्ठल सेवक योजनेचा शुभारंभ आता आषाढी यात्रेपासून सुरु होणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी याबाबतची माहिती दिली. या निर्णयामुळे भाविकांची इच्छा पूर्ण होणार असून आता भाविकांना मोफत विठ्ठलाची सेवा करता येणार आहे. यामुळे आता आपल्या लाडक्या सावळ्या विठुरायाच्या मंदिरामध्ये आता सामान्य भाविकांना थेट सेवेकरी म्हणून काम करता येणार आहे. 


प्रत्येक तीर्थक्षेत्र स्थळी भक्तांच्या सेवेसाठीच्या अनेक उपाययोजना कराव्या लागतात. त्यासाठी मोठे मनुष्यबळ लागते. यासाठी शेगाव देवस्थान आणि तिरुपती देवस्थानामध्ये सामान्य भाविकांना थेट सेवेकरी म्हणून रुजू करून घेत लोकसहभागातून देवस्थानचे व्यवस्थापन केले जाते. अशाच पद्धतीचा  प्रयोग आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये होणार आहे. विठ्ठल मंदिरात सेवेकरी म्हणून भाविकांना रुजू करून घेण्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर आषाढी यात्रेवेळी थेट भाविकांना सेवेकरी म्हणून काम करता येणार आहे. 


याबाबत आज मंदिर समितीच्या बैठकीत सेवेकरी मंदिरात घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये यात्रा काळात ज्या ठिकाणी सेवेची गरज असेल त्या ठिकाणी हे विठ्ठल सेवक सेवा देतील असे नियोजन केले जात आहे. यासाठी नियमावली बनवली जाणार असून आषाढीला जर हा प्रयोग यशस्वी झाल्यास वर्षभरासाठी विठ्ठल सेवक योजना लागू होऊ शकेल. 


सध्या मंदिर कर्मचाऱ्यांच्या पगारावर भाविकांच्या देणगीतील लाखो रुपये खर्च होतात. याशिवाय मंदिर व्यवस्थापन तात्पुरते म्हणून देखील शेकडो कर्मचाऱ्यांना वेळोवेळी नियुक्ती देत असते. याचा आर्थिक बोझा मंदिरावर पडतो. त्यामुळे ही योजना लागू झाल्यास भाविकांच्या देणगीचा वापर भाविकांच्या विकासकामासाठी होऊ शकणार आहे. याशिवाय खाजगी कर्मचारी, खाजगी सुरक्षा रक्षक यांच्यामुळे मंदिराच्या व्यवस्थापनात निर्माण झालेला गलथानपणा बंद होईल आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीला फटका आता भाविकांना बसणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 



दरम्यान, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Palkhi) 11 जूनला आळंदीमधून (Alandi) प्रस्थान करेल. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये (Pandharpur) पोहचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी (Vitthal) भेट घडेल. वारकरी संप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते.