Solapur Latest News Update : सोलापुरातील दादाश्री प्रतिष्ठानचे प्रमुख आणि लिंगायत समजाचे नेते उदयशंकर पाटील यांचा भाजपत प्रवेश झाला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश झाला. मागील अनेक दिवसांपासून उदयशंकर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत्या. भाजपचे मिशन 2024 चे संयोजक, आमदार श्रीकांत भारतीय यांनी मागील महिन्यात त्यांच्या निवासस्थानी येऊन भेट देखील घेतली होती. तेव्हापासून उदय पाटील यांचे भाजप प्रवेश निश्चित मानले जात होते. उदय पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्याला आमदार श्रीकांत भारतीय, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष  आमदार सचिन कल्याणशेट्टी हे देखील उपस्थित होते. 

उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. लिंगायत समाज या मतदारसंघात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार, माजी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख हे या मतदार संघात चौथ्यादा निवडून आले आहेत. मात्र सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या वादामुळे लिंगायत समाजात प्राबल्य असलेले धर्मराज काडादी हे विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात गेले आहेत. समाजाने पर्यायी व्यवस्था विचार करावी अशी घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. जर धर्मराज काडादी हे उदय पाटील यांच्या बाजूने उभे राहिले तर विजयकुमार देशमुख यांच्या जागी भाजपचा नवा पर्याय म्हणून उदय पाटील यांचा विचार होऊ शकतो. तसेच सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात उदय पाटील यांनी निवडणूक लढविली आहे. त्या निवडणुकीत त्यांनी चांगली मते मिळवली होती. तसेच त्यांचे काका रतिकांत पाटील हे शिवसेनेचे आमदार याच मतदारसंघातून राहिले आहेत. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघात देखील उदय पाटील यांचा जनसंपर्क आहे. पक्ष वाढीच्या दृष्टीने भाजपाला  येथे देखील फायदा होऊ शकतो.

आमदार सुभाष देशमुख यांनी उदय पाटील यांना भाजप प्रवेशाबाबत शुभेच्छा दिल्या. "सोलापूर जिल्हा आता बऱ्यापैकी भाजपमय झाला आहे. फक्त माढा आणि करमाळा तेवढा राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसमुक्त भारत असे स्वप्न आहे. पण तुम्हा आम्हाला सोलापूरमुक्त काँग्रेस करून मोदींचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली, तर सोलापुरात कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचे आहे. काँग्रेसमुक्त सोलापूर करण्याची जबाबदारी उदय पाटील यांनी घ्यावी आणि गुढी पाडव्याच्या दिवशी त्यांनी भाजपयुक्त आणि काँग्रेसमुक्त सोलापूर जिल्हा अशी संकल्पना करावी" अशा शुभेच्छा भाजपचे आमदार, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या.

कोण आहेत उदयशंकर पाटील?

सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. उदय शंकर पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक काँग्रेस पासून केली. युवक काँग्रेसचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मात्र अंतर्गत गटबाजीतून सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसमधून ते अलिप्त झाले. 2004 साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना सोलापूर दक्षिण मतदार संघातून उदयशंकर पाटील यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेविरोधात निवडणूक लढवल्याने उदयशंकर पाटील यांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. मात्र निवडणुकीसाठी 25 वर्ष पूर्ण नसताना खोटा दाखला बनवून निवडणूक लढविल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता.  आर.पी. ग्रुपच्या माध्यमातून उदयशंकर पाटील यांनी राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. सोलापुरात दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी भव्यदिव्य गणेशोत्सवाद्वारे युवकांचे संघटन बांधले. कर्नाटकातील भाजपचे दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या माध्यमातून भाजपशी जवळीक साधली. याचबरोबर नाही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याशी कायम संपर्कात राहिले.