Solapur Gram Panchayat Election 2022:  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Solapur Gram Panchayat Election Result)  2022 लागला असून भाजप  सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व सिद्ध केले तर शिंदे गटाने शिवसेनेच्या ठाकरे गटापेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. सोलापुरात 189 जागांसाठी मतदान पार पडले. 


अक्कलकोट तालुक्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपली प्रतिष्ठा राखली


अक्कलकोट तालुक्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपली प्रतिष्ठा राखली असली तरी सिद्धाराम म्हेत्रे यांनी सत्तेत नसताना देखील तुल्यबळ लढत दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप जरी सर्वाधिक जागावरती निवडून आला असला तरी विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना अनेक गावांमध्ये फटका बसला आहे. मंद्रूप आणि निंबर्गीसारख्या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजपच्या पॅनलला धोबीपछाड दिली आहे.


बार्शी तालुक्यात बन शिंदे यांचे समर्थक पॅनल विजयी


बार्शी तालुक्यात भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे. माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांना अक्षरशः धोबीपछाड दिली आहे. तालुक्यातील आठही ग्रामपंचायतींवर बबन शिंदे यांचे समर्थक पॅनल विजयी झाले आहे. 


उत्तर सोलापुरात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख सत्ताधारी


उत्तर सोलापुरात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख सत्ताधारी आहेत. मात्र या ठिकाणी माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या महाविकास आघाडीच्या समर्थक पॅनलला मोठे यश मिळाले आहे. शिंदे गटाचे नेते, शहाजी बापू पाटील यांनी  राष्ट्रवादीशी हात मिळवणीकरून सांगोला तालुक्यात आपली प्रतिष्ठा राखली आहे.


माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांची एकहाती सत्ता 


माळशिरस तालुक्याचे भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तालुक्यावर आपली एकहाती सत्ता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. 35 पैकी 23 जागांवर मोहिते पाटील समर्थक विजयी झाले.


करमाळा तालुक्यात शिंदे गटाच्या रश्मी बागल आणि नारायण पाटील या दोन्ही नेत्यांनी वर्चस्व राखत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली आहे. 30 पैकी 20 जागांवरती बागल आणि पाटील यांच्या समर्थकांनी विजय प्राप्त केला. राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजय शिंदे समर्थकांना केवळ दहा जागांवर विजय मिळवता आला.  विशेष म्हणजे करमाळ्यात भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाला खाते देखील उघडता आले नाही.


मंगळवेढा तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार  समाधान आवताडे यांना एकहाती वर्चस्व


मंगळवेढा तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार  समाधान आवताडे यांनी एकहाती वर्चस्व गाजवलं. 18 पैकी 13 जागांवर समाधान आवताडे समर्थक पॅनलचे उमेदवार विजयी झाले.


सोलापूर ग्रामपंचायत फायनल निकाल -


भाजप  - 75
शिंदे गट - 26 
राष्ट्रवादी - 41 
काँग्रेस -  12 
ठाकरे गट -  12
इतर - 23


 एकूण 189/189