Continues below advertisement

Solapur Flood Central Team Night Inspection : मराठवाडा आणि आजूबाजूच्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Marathwada Rain) झाली आणि त्यामुळे शेतकरी घायकुतीला आला. अशा वेळी नुकसानीची लवकरात लवकर आणि स्पष्ट उजेडात पाहणी होऊन मदत मिळेल अशी आशा पूरग्रस्त शेतकऱ्यांना होती. पण प्रशासनाने अखेर त्यांचा खरा 'रंग' दाखवल्याची चर्चा आहे. नुकसानीची पाहणी करायला एका महिन्याने केंद्रीय पथक (Central Team) सोलापुरात (Solapur Flood News) आलं खरं, पण त्यांना रात्रीचा मुहूर्त सापडला. एवढ्या व्यस्ततेतून वेळ काढत या पथकाने रात्रीच्या अंधारात, टॉर्चच्या मदतीने पुरामुळे झालेल्या नुकसान पाहणीचा 'दिखावा' केला.

सोलापुरातील मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी पाहणी केली. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी केंद्रीय पथक रात्रीच्या अंधारात दाखल झालं. सीना नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याची जबाबदारी या पथकावर होती.

Continues below advertisement

महत्त्वाचं म्हणजे कोळेगावातील नुकसानीच्या पाहणी दौरा आधीपासूनच नियोजित होता अशी माहिती सूत्रांनी दिली. पण हे पथक पुण्याहून इतक्या उशीराने निघाले की रात्री उशीरा कोळेगावात पोहोचले. मग त्यांनी अंधारातच घाईघाईने पाहणी उरकली. ही तिथल्या शेतकऱ्याची क्रूर चेष्टाच आहे. यामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे.

Solapur Flood News : रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांशी संवाद 

केंद्रीय ग्राम विकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करन सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल, आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग हे चार सदस्यीय केंद्राचे पथक मोहोळमध्ये रात्रीच्या अंधारात दाखल झालं. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

केंद्राच्या या पथकाने सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, पुराची माहिती घेतली. तसेच त्यामुळे झालेल्या नुकसान बाबतही जाणून घेतले.

Central Team Crop Damage Inspection : टॉर्चच्या प्रकाशात पाहणीचा दिखावा

रात्रीच्या वेळी, काळकुट्ट अंधारात या पथकाने पूरस्थितीची पाहणी केली. या पथकासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या टाचा वर केल्या, हात जितके जातील तितके वर करून लांबच लांब टॉर्च पाडला. त्या टॉर्चच्या उजेडात या केंद्रीय पथकाने त्यांच्या दूरदृष्टीने नुकसान स्थितीचा आढावा घेतला.

या पथकाने कोळेगावातील काही शेतकऱ्यांशी रात्रीच्या अंधारातच चर्चा केली. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे आपल्या कुटुंबाच्या, पोराबाळांच्या आयुष्यात अंधार कसा पडलाय हे शेतकऱ्यांनी घायकुतीला येऊन सांगितलं. ते केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी ऐकूनही घेतलं. तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी या पथकाने त्याच ठिकाणी चर्चा केली.

Marathwada Flood Inspection : अंधारातील पाहणीने मदत मिळणार का?

पूरस्थितीला महिना उलटला तरी केंद्रीय पथक त्याची पाहणी करायला आलं नव्हतं. त्यामुळे मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारात गेली. आता एका महिन्यानंतर या केंद्रीय पथकाला मुहूर्त मिळाला तोही रात्रीचा. अशा रात्रीच्या घाईगडबडीतच त्यांनी गंभीरपणे पाहणी केल्याचं नाटकही केलं.... म्हणजे पूरस्थितीच्या पाहणीचा दिखावा केला. शेतकरी बोलत असताना अधिकाऱ्यांनी मानाही हलवल्या.

सोलापूरकरांवर अत्यंत भयंकर परिस्थिती आली असतानाही त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी किंवा त्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय पथकाने दुसऱ्या दिवशीच्या सकाळचीही वाट पाहिली नाही, इतक्या तत्परतेने या केंद्रीय पथकाने काम केलं. त्यामुळे आता तितक्याच तत्परतेने शेतकऱ्यांना मदतही मिळावी हीच अपेक्षा.

ही बातमी वाचा: