सातारा : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यामध्ये आता बडे बडे राजकीय हस्तीही त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात फटलणच्या नगराध्यक्षपदापासून झाली, आता सांगताही नगराध्यक्षपदाने होऊ द्या असं वक्तव्य रामराजे निंबाळकरांनी केलं. रामराजे निंबाळकरांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.
आघाडी सरकारमध्ये पंधरा वर्षे आम्ही काम केलं. आताही जमेल तिथे युती, नाही जमणार तिथे स्वतंत्र लढा. चिन्हावर लढायचं असेल तर चिन्हावर लढा. मी सध्या घड्याळ चिन्हावर आहे, अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचे नियोजन करतील असं रामराजे निंबाळकरांनी म्हटलंय.
Ramraje Nimbalkar on Election: नगराध्यक्षपदासाठी इच्छुक
रामराजे निंबाळकर म्हणाले की, "मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात फटलणच्या नगराध्यक्षपदाने केली होती. आता आयुष्याच्या शेवटीसुद्धा मी नगराध्यक्षपदासाठी उभा राहणार आहे. माझं कुटुंब किंवा माझा मुलगा माझ्या विरोधात जाणार नाही. पहिल्यांदा मी नगराध्यक्ष झालो, आता शेवटही माझा नगराध्यक्ष होऊ द्या."
रामराजे निंबाळकर हे आघाडी सरकारमध्ये असताना ते राज्याच्या मंत्रिमंडळात होते. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेचे सभापतीपदही भूषवलं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजितदादांसोबत जरी गेले असले तरी त्यांनी कधीही शरद पवारांना कधीही विरोध केला नाही.
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: रणजितसिंह निंबाळकरांना थेट विरोध
फलटणच्या डॉक्टर आत्महत्येनंतर जुना राजकीय वाद पुन्हा उफाळून आल्याचं दिसून येतंय. भाजप नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध माजी सभापती रामराजे निंबाळकर वाद शिगेला पोहोचला आहे. रणजितसिंहाचे जुने हिशेब चुकते करणार असून 277 केसेस घेऊन हायकोर्टात जाण्याचं थेट आव्हान रामराजेंनी दिलं. तसंच पक्ष सोडावा लागला तरीही चालेल, मात्र रणजितसिंह निंबाळकांच्या पक्षासोबत आणि पॅनलमध्ये जाणार नाही अशी थेट घोषणा रामराजेंनी केली.
फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी उभं राहण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. आपल्यावरच्या सर्व आरोपांचे मास्टरमाईंड रामराजे असल्याचा आरोप आधीच्या पत्रकार परिषदेत रणजित सिंह निंबाळकरांनी केला होता. त्याला पत्रकार परिषदेतून रामराजेंनी सडेतोड उत्तरं दिली. रणजित सिंहांच्या दुग्धाभिषेकावरही त्यांनी सडकून टीका केली. त्यांनी अभिषेक केला मी तर गोमूत्र ओतून घेणार असल्याचं म्हणत रामराजेंनी टोला लगावला. त्यामुळे हा वाद नेमका कोणत्या पातळीला जाणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
ही बातमी वाचा: