मुंबई : सध्या फेसबुक अन् इंस्टाचा जमाना आहे, हे वाक्य नेहमीच आपल्या कानावर पडत असतं. तर, सोशल मीडियामुळे, रील्समुळे पिढी बिघडत चाललीय, नको त्या सवयी तरुणाईला लागल्या आहेत, लफड्यांचं प्रमाण वाढलंय असंही काहीजण म्हणतात. मात्र, याच इंस्टाग्रामने एका निखळ, निस्वार्थी प्रेमाला जगासमोर आणलंय. डिजिटल इंडियाने सीमारेषेचं बंधन कधीच तोडलं आहे, सोशल मीडियामुळे गल्लीतलं दिल्लीत पोहोचायला जराही वेळ लागत नाही. त्यातूनच, सोलापुरातील (Solapur) एका निस्वार्थी प्रेमाची कथा, 70 मिमि सिनेमाच्या (Cinema) पडद्यापर्यंत पोहोचली आहे. अटेंशन आणि फेक कंटेंटच्या माध्यमातून फॉलोअर्स वाढविण्याच्या जमान्यात एका आपल्या सावित्रीचे प्राण सत्यवानाने यमदेवाच्या तावडीतून परत आणले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोलापूरच्या आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे यांच्या अजरामर प्रेमाची (Lovestory) ही कथा.
अंजलीबाई या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रिलस्टार अंजलीचे मजेशीर आणि हसते-खेळते व्हिडिओ चांगलेच व्हायरल होतं. सोशल मीडियावर ती आणि तिचा जोडीदार नारायण चांगलेच फेसम होते. आपल्या मनोरंजनात्मक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी चाहता वर्गही निर्माण केला. मात्र, त्यांच्या या प्रेमाला कुणाची नजर लागावी अशी घटना घडली. नारायण आणि अंजलीच्या लग्नानंतर काही दिवसांतच या जोडप्याच्या आयुष्यात मोठा आघात व्हावा अशी घटना घडली. अंजलीला ब्रेन ट्यूमर म्हणजेच मेंदूचा कर्करोग असल्याचे निष्पण झाले. चेहऱ्यावर कायम स्माईल असलेल्या अंजलीचा चेहरा अबोल झाला, तिच्या आनंदावर दु:खाची छटा उमटू लागली. तर, आपल्या जोडीदारासमोर नियतीने मांडून ठेवलेलं हे डोंगराएवढं दु:ख पाहून नारायणही हादरुन गेला. मात्र, तिच्यासाठी तो पहाडासारखा उभा राहिला. तिच्या पाठीशी, तिच्या सोबत प्रत्येक पाऊला पाऊल टाकून तो चालू लागला. नारायणनेच तिला धीर दिला अन् चक्क मृत्यूच्या दाढेतून इथे एका सत्यवानाने आपल्या सावित्रीला परत आणले असंच म्हणावं लागेल.
अंजलीला एका बाजूने अर्धांगवायूचा झटका देखीला आला होता, मात्र अशा गंभीर आणि दु:खद परिस्थितीतही आकाशने अंजलीला भक्कम साथ दिली. आकाश तिच्यासमवेत रिल्स बनवू लागला. आपल्या निस्सीम, निस्वार्थी प्रेमाचं उदाहरणच त्याने या रिल्सच्या माध्यमातून जगासमोर ठेवलं. त्यांची प्रेमकथा आणि रिअलवाली रिल्स स्टोरी तुफान व्हायरल झाली. प्रेमकथांच्या चित्रपटासाठी ओळखल्या जाणाऱ्या दाक्षिणात्या सिनेमापर्यंत त्यांची ही लव्हस्टोरी पोहोचली अन् आता लवकरच या दोघांच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास 70 मिमि पडद्यावर झळकत आहे.
करियप्पा आणि क्रिटिकल कीर्तनेगलूच्या केमिस्ट्रीसाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते कुमार यांनी ''लव्ह यू मुड्डू'' नावाचा चित्रपट बनवला आहे. येत्या 7 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत असून निखळ प्रेम, संयमाचा संदेश या चित्रपटातून त्यांनी दिलाय. आयुष्य कितीही खडतर असले तरी खरं प्रेम कधीच हार मानत नाही, प्रेमाला कितीही सत्वपरिक्षा द्याव्या लागल्या तरी त्या परिक्षेतून स्वत:ला सिद्ध करण्याची ताकद या प्रेमात असते, अंजली आणि नारायण यांची ही प्रेमकथाही अशीच फेक रिल्सच्या जमान्यात मोठ्या पडद्यावर झळकणारी रिअल स्टोरी आहे.
हेही वाचा
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल