सोलापूर : सोलापुरातील (Solapur News) अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका टेक्स्टाईल कारखान्याला आग लागल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुपम विविंग मिल असे या कारखान्याचे नाव आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास या कारखान्यांमध्ये आग लागली होती. प्राथमिक अंदाजानुसार गॅसवर स्वयंपाक करत असताना आगीचा भडका उडून ही घटना घडल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त करण्यात आला आहे.
मनोज लक्ष्मीधर देहुरी, (वय 20, रा. ओडिसा), आनंद लक्ष्मीनारायण बगदी (वय 30, रा. पश्चिम बंगाल) सहदेव बुद्धवार बगदr (वय 22, रा. पश्चिम बंगाल) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघा परप्रांतीय कामगारांची नावे आहेत. रुपम विविंग मिल या कारखान्याच्या तळमजल्यावरती मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तर पहिल्या मजल्यावर कामगारांची राहण्याची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी कामगारांनी आपल्या स्वयंपाकासाठी गॅस शेगडी,इलेक्ट्रिक शेगडी इत्यादी देखील लावून ठेवले होते. याच मजल्यावर पॅकेजिंगसाठी लागणारे रिकामे पुठ्ठे देखील ठेवण्यात आले होते.
आज सकाळी सहाच्या सुमारास इथे असलेल्या कामगारांपैकी एकाने स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवला. याच वेळेस अचानक आग लागली. या कामगाराने तिथे असलेल्या पुट्टे आणि टॉवेलच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने अधिकच भडका घेतल्याने त्याने तिथून पळ काढला. मात्र यावेळी शेजारी असलेले एका खोलीत तीन कामगार झोपलेले होते. आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्याने या तिघांना तिथून निघणे शक्य झाले नाही. त्यामुळे या तिघाही कामगारांचा आगीने होरपळून तसेच श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. मागील आठवड्यात देखील याच कारखान्यात आगीची घटना घडली होती. त्यावेळी अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली होती. यामुळे अग्निशमन दलाला कारखान्याच्या परिसराची माहिती आधीपासूनच होती. ही आग विझवण्यासाठी जवळपास 10 पाण्याच्या बंबांचा वापर करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलातर्फे देण्यात आली. पॅकेजिंगचे साहित्य जळाल्याने कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान जरी झाले नसले तरी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोठी हानी झाली.
ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तिथे कायम धोका असतो. अशा ठिकाणी कामगारांची राहण्याची सोय करण्यात येऊ नये. या कारखान्यांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली असून त्याच ठिकाणी गॅसची देखील व्यवस्था होती. घटना घडली तेव्हा एकही खिडकी उघडी नव्हती. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली. सुरुवातीच्या काळात या कामगारांनी जर तिथून पळ काढला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी प्रतिक्रिया सोलापूर अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी दिली.