Solapur Crime : सोलापूर (Solapur) शहर आणि ग्रामीण भागात मागील काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यातच सोलापुरातील पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीला जात असल्याच्या तक्रारी देखील येऊ लागल्या. यामुळे सोलापुरातील सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी अलर्ट मोडवर होते. मात्र सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठे यश प्राप्त झाले आहे. चोरी झालेल्या तब्बल 16 रिक्षा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एपीआय रोहित चौधरी यांच्या पथकाने हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास 23 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी दिली.


सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी रिक्षा चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एपीआय रोहित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथक करत होते. यावेळी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातल्या गोदूताई विडी घरकुल परिसरात राहणारे सैफ इरफान यादगीर आणि बिलाल सलीम गदवाल हे दोघे चोरी सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दोन संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी सुरु केली. पोलिसांच्या चौकशीत या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेल्या रिक्षा या कर्नाटकात विकल्याची माहिती देखील त्यांनी पोलिसांना दिली.




चोरलेल्या रिक्षांची विल्हेवाट कशी लावायचे?
आरोपी सैफ यादगीर आणि बिलाल गदवाल रिक्षा चोरायचे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कर्नाटकातील मध्यस्थाला गाठायचे. एक रिक्षा 35 ते 40 हजार रुपयांना विकायचे. मध्यस्थ त्या रिक्षामध्ये फेरफार करुन एक लाखाला विकायचे. मात्र, अखेर त्यांच्या या कृत्याचे बिंग फुटले. एमआयडी पोलिसांनी कर्नाटकात जाऊन रिक्षा हस्तगत करुन सोलापूरला आणल्या. यातील पाच रिक्षा सोलापूर आयुक्तालायच्या हद्दीतून चोरीला गेल्या होत्या.


सहा रिक्षांची आणि मालकांची ओळख अद्याप पटलेली नाही
त्या संदर्भात सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन, जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोन, जेल रोड पोलीस ठाण्यात एक असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. तर पाच रिक्षा या सोलापूर ग्रामीण हद्दीतून चोरीला गेल्या होत्या. उर्वरित रिक्षा चालकांच्या मालकांचा शोध पोलिसांच्या मार्फत घेतला जात आहे. चोरीला गेलेल्या या रिक्षांच्या नंबर प्लेट पूर्णपणे बदलण्यात आल्या होत्या. सोबतच चेसी नंबर आणि इंजिन नंबर खोडण्यात आले आहे. त्यामुळे सहा रिक्षांची आणि त्यांच्या मालकांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी दिली.


ही कारवाई पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, सपोनि रोहित चौधरी यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार राकेश पाटील, पोलीस नाईक सचिन भांगे, चेतन रुपनर, मंगेश गायकवाड, अमोल यादव, अश्रूभान दुधाळ, शंकर याळगी, काशिनाथ वाघे, शैलेश स्वामी, सचिन जाधव, मोहसीन शेख, इकरार जमादार, बागलकोट, नवनाथ लोहार यांनी केली.