सोलापूर : घरातील वाद किती विकोपाला जाऊ शकतात याची प्रचिती आणणारी धक्कादायक घटना सोलापुरात घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे अंत्रोळी येथे घरगुती भांडणाच्या रागातून स्वतःच्या वडिलांची हत्या एका मुलाने केलीय. विशेष म्हणजे मुलाचा मामा देखील या हत्येत सहभागी होता. मंद्रुप पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी मुलगा तानाजी थोरात आणि त्याचा मामा भीमराव जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. 


13 ऑगस्ट रोजी मयत शिवाजी थोरात याने आपल्या पत्नीस मारहाण केली होती. यांसदर्भात जेव्हा मृत व्यक्तीचा मुलगा तानाजी याला माहिती समजली त्याने घरी जाऊन पाहणी केली. तेव्हा आई रक्तबंबाळ असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा आईला रुग्णालयात भरती करण्यासाठी तो तात्काळ रुग्णालयच्या दिशेने गेला. वाटेत भाऊ भेटल्याने आईला भावाला रुग्णालयात घेऊन जायला सांगून तो रागाच्याभरात घराकडे परतला.


आईला मारहाण का केली याचा जाब विचारत तानाजीने मामा भीमराव याच्या मदतीने वडिलांना मारहाण करण्यास सुरु केलं. राग इतका टोकाला गेला की तानाजीने वडिलांना नारळाच्या झाडाला बांधून लाकडी वाशाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये मृताच्या शरीरातील बरगड्या तुटल्या होत्या. झालेल्या या मारहाणीत शिवाजी थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.


या प्रकारानंतर आपल्यावर कारवाई होऊ नये यासाठी आरोपींनी अपघात झाल्याचा बनाव देखील केला. आईला मारहाण केल्यानंतर गाडीवर जात असताना वडील शिवाजी थोरात पडले यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अशी तक्रार आरोपीने स्वतःच पोलिसात दिली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन पोलिसांनी संशय बळावल्याने कसून तपास केला.


परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली. मोटारसायकलचे निरीक्षण केले. तेव्हा मृत शिवाजी यांनी पत्नीला केलेली मारहाणीची घटना पोलिसांच्या कानावर आली. तेव्हा पोलिसांनी आरोपी मुलगा तानाजीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरु केली. यावेळी आरोपी तानाजीने घडलेल्या घटनेची संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. 


नारळाच्या झाडाला बांधून मामाच्या मदतीने वडिलांना संपविले


मृत शिवाजी थोरात हे आपल्या पत्नीपासून विभक्त राहत होते. पती-पत्नीत नेहमी वाद होत होते.13 ऑगस्ट रोजी शिवाजी थोरात घरी आले आणि कौटुंबिक वादातून पत्नीस मारहाण करू लागले. वाद विकोपास जाऊन शिवाजी थोरात यांनी पत्नीच्या पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातला. जखमी आईस मुलगा तानाजीने रुग्णालयात उपचार करून वडिलांना शोधून आणले. त्यानंतर नारळाच्या झाडाला बांधून मामा भीमराव जाधव याच्यासह मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत शिवाजी थोरात गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरातील बरगड्या देखील तुटल्या होत्या. 


आरोपी मामा-भाच्यास पोलीस कोठडी


अकस्मात मृत्यू बाबत तपास करत असताना वेगळीच माहिती समोर आल्याने पोलीस उपनिरीक्षक  करपे यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भदंवि कलम 302, 177, 34, 342, 504 अन्वये गुन्हा नोंद केला. तसेच आरोपी मुलगा तानाजी थोरात आणि आरोपी भीमराव थोरात या दोघा मामा-भाच्यास अटक केले. आरोपींना न्यायलयात हजर केले असता 18 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केलीअसल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी दिली आहे.