Ujani and Veer dam : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहेत. धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्याच्या परिसरात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाच्या संततधारेमुळे उजनी (Ujani) आणि वीर धरण (Veer Dam) ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत 50 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 32 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला आहे. 


नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


उजनी आणि वीर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये सुरु असल्यानं पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळं प्रशासन अलर्ट मोडवल आले आहे. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीमुळं प्रशासनाने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




प्रशासनाने तब्बल लाखभर लोकांचे पुनर्वसन करण्याची तयारी


चंद्रभागेत हा 85 हजार क्युसेकचा विसर्ग पोहोचल्यानंतर परिस्थिती अवघड बनण्यास सुरुवात होणार आहे. चंद्रभागेत 1 लाख 10 हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी आल्यास शहरातील व्यास नारायण मंदिर, बडवे चर याठिकाणी पाणी शिरण्यास सुरुवात होते. यासोबतच सरकोली, पटवर्धन कुरोली, उंबरे पागे यासारख्या ग्रामीण भागातील 8 गावात देखील पाणी शिरण्यास सुरुवात होते. यासाठी प्रशासनाने तब्बल लाखभर लोकांचे पुनर्वसन करण्याची तयारी ठेवली आहे. पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या उजव्या काठावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत. याशिवाय ओढे आणि नाल्यात हे नदीचे पाणी शिरुन धोका होणारी काही गावे असून, एकूण 46 गावांना पुराचा धोका संभवू शकतो. सध्या प्रशासनानं शहरात 2 बोटी आणि कोळी बांधवांच्या होड्या सज्ज ठेवल्या असून, कोणत्याही भाविकाला चंद्रभागा पात्रात न जाण्याचं आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केलं आहे. 




राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
 
राज्यात अनेक ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे.  या पावसामुळं अनेक ठिकाणी सेती पिकाचे नुकसान झाले आहे. विशेषत मराठवाडा आणि विदर्भातील शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: