Solapur Barshi Fire : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये (Solapur Barshi Pangri Fire News) फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बार्शीपासून वीसेक किलोमीटर असलेल्या पांगरी आणि शिराळा गावाच्या मध्यभागी असलेली ही फटाक्यांची फॅक्टरी. आजूबाजूच्या शिराळा, वालवड, वाघाचीवाडी गावातले कामगार या फॅक्ट्रीत कामाला यायचे.
आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. या घटनेतील मृतांचा आकडा मोठा असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. युसूफ मणेरी नावाच्या व्यक्तीचा हा फटका कारखाना होता. आज दुपारी अचानक ब्लास्ट झाला. त्यामुळे काम करत असलेले कर्मचारी आतच अडकले.
याठिकाणी काम करत असलेल्या शकुंतला सुहास कांबळे यांनी आपबीती कथन केली. त्यांनी सांगितलं की, जेसीबीनं काम चालू होतं. त्याचा खडखड आवाज चालू होता. तिथं एकाएकी आग लागली. तेवढ्यात आमचे मालक म्हणाले पळा आग लागलीय. मग मी जीवाच्या आकांतानं पळत सुटले. मागं काय घडलं ते कळलंच नाही. मला चक्कर आली, असं शकुंतला कांबळे यांनी सांगितलं.
या घटनेचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत फटाक्यांचा भीषण आवाज येतोय आणि आगीचे अन् धुराचे लोट आकाशात दिसत आहेत. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते.
घटनेची माहिती कळताच बार्शी, उस्मानाबाद, सोलापूर इत्यादी ठिकाणहून अग्निशमन बंब पाठवण्यात आले. आगीवर नियंत्रण आणलं गेलं आहे. सोलापूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात बर्न केअर वॉर्ड तयार ठेवण्यात आला असल्याची देखील माहिती आहे.
आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच राज्यात नाशिकमधील इगतपुरी आणि सोलापुरातील बार्शीतील या दोन्ही घटनांमध्ये काही कामगारांना जीव गमावावा लागला आहे. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते भीषण आहेत.
चाळीस वर्षापूर्वी अशीच घटना फॅक्ट्रीचे मालक मन्यार यांच्या घरात घडली होती
स्थानिक रहिवाशी आणि मदतकार्यात सहभागी असलेले राहुल बगाडे, यांनी सांगितलं की, अडीच वाजण्याच्या सुमारास मोठं मोठे स्फोट होतं होते, त्यामुळे आम्ही लगेचच इथे आलो. जीव वाचवण्यासाठी महिला भाजलेल्या अवस्थेत विवस्त्र पळत होत्या. अतिशय विदारक स्थिती होती. पांगरीतील युसूफ मन्यार यांचा हा कारखाना असून दहा वर्षांपासून होता. चाळीस वर्षापूर्वी अशीच घटना मन्यार यांच्या घरात घडली होती, त्यातही ही लोकांचा जीव गेला होता, अशी माहितीही बगाडे यांनी दिली. स्थिती बघून असं वाटते की क्षमतेपेक्षा जास्त दारू गोळा इथे साठवला होता. साधारण 25-30 कामगार दररोज इथे असतात, पण रविवार आणि नवीन वर्ष असल्याने आज लोकं कमी होते. मालकाची संपूर्ण चौकशी व्हायला हवी, त्यांना परवानगी कोणी दिली. स्फ़ोट झल्यानंतर त्यांना फोन लावला तेव्हा फोन बंद होता, आज ते कामाला आलेले होते. आम्ही इथे येतं असताना त्यांचा मुलगा जखमी अवस्थेत पळत होता, असं माजी सरपंच डॉ. विलास लाडे यांनी सांगितलं.
ही बातमी देखील वाचा
Solapur Barshi Fire : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, अनेक कामगार जखमी