Continues below advertisement

सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Barshi) निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नगरपालिका निवडणुकांचा निकाल पुढे ढकल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत (Election) काय होणार याची उत्सुकता बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय नेते व सहकारी संस्थांना होती. त्यासाठी, रविवार 7 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. बाजार समितीच्या एकूण 18 जागांसाठी 96.48 टक्के एवढे मतदान झाले. त्यामुळे, आज सकाळपासूनच निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. माजी आमदार आणि भाजप (BJP) नेते राजेंद्र राऊत यांच्या गटाने बाजार समितीवरील सत्ता कायम ठेवली असून 18 जागांपैकी हाती आलेल्या 11 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व स्थापन केले.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान, 18 जागांपैकी व्यापारी मतदारसंघातील 2 जागा अगोदरच बिनविरोध झाल्याने उर्वरित 16 जागासाठी काल चूरशीने मतदान झालं. सुमारे 96.98 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आमदार दिलीप सोपल पुरस्कृत बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये ही लढाई होती. याशिवाय 4 अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत. त्यामुळे, आज विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Continues below advertisement

आधी व्यापारी मतदारसंघातील 2, हमाल तोलार 1, ग्रामपंचायत मतदारसंघातील 4 आणि सोसायटी मतदारसंघातील 4 जागांचे निकाल हाती आले असून 11 पैकी 11 जागांवर राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे, आमदारकीला पराभव झालेल्या राजेंद्र राऊत यांच्या अंगावर बाजार समितीच्या माध्यमातून विजयाचा गुलाल लागला. दरम्यान, अद्यापही सोसायटी मतदारसंघातील 7 जागांचा निकाल बाकी आहे.

कोण होणार सभापती?

बार्शी शहरातील मतमोजणी केंद्राबाहेर आमदार दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन्ही गटाचे कार्यकर्ते होते. पहिल्या निकालानंतरच राऊत समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला होता. त्यानंतर, विजयाची मालिका कायम राखत राऊत गटाच्या बळीराजा विकास आघाडीने बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व निर्माण करत सत्ता कायम राखली. दरम्यान, आता सभापतीपदी कोणचाी वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारण, गत 5 वर्षे बाजार समितीचे सभापती राहिलेल्या रणवीर राऊत यांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून बाजुला ठेवण्यात आले होते, परंतु त्यांच्याकडे संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे, आता विजयानंतर सभापतीपदाचा गुलाल कोणाच्या माथी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

 नागपूरच्या हॉटेलमध्ये भास्कर जाधव शिंदे गटाच्या नेत्याला भेटले, VIDEO व्हायरल, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना उधाण