Shri Vitthal Sugar Election : पंढरपूर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलं आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून, उद्या मतदान होत आहे. शेतकऱ्यांचा 'राजवाडा' अशी ओळख असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सर्वच राजकीय नेत्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. त्यामुळं हा कारखाना काबीज करण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या कारखान्याच्या 21 जागांसाठी उद्या (5 जुलै) मतदान होणार आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. यामध्ये सत्ताधारी असणाऱ्या भालके गटापुढं युवराज पाटील आणि अभिजीत पाटील या दोन गटांचं मोठं आव्हान आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळं या निवडणुकीत 'विठ्ठल' कोणाला पावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 




दरवर्षी 10 ते 12 लाख टन उसाचं गाळप करणारा कारखाना बंद असल्यानं पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हा करखाना बंद असल्यामुळं सत्ताधारी भालके गटावर विविध प्रकारचे आरोप होत आहेत. सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हे दिवंगत माजी आमदार  भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे आहेत. त्यांच्या जोडीला चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आहेत. सत्ताधारी असणाऱ्या विठ्ठल परिवारात फूट पडली आहे. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन औदुंबंर पाटील यांचे नातू युवराज पाटील यांच्यासह अॅड. गणेश पाटील आणि अॅड. दीपक पवार यांनी सत्ताधारी गटातून फारकत घेत त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. तर या दोन्ही पॅनलपुढे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या पॅनलचे मोठं आव्हान आहे. अभिजीत पाटील यांच्या साथीला प्रा.बी.पी. रोंगे सर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे. त्यामुळं ही लढत चुरशीची होणार असून, तिन्हीही गटाकडून विजयाचे दावे करण्यात आले आहेत.


हे तिन पॅनल मैदानात


या निवडणुकीत अभिजीत पाटील यांचा श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी आहे. त्यांच्या पॅनेलला घड्याळ चिन्ह मिळालं आहे. तर युवराज पाटील यांचा आण्णा भाऊ विकास शेतकरी पॅनेल आहे. त्यांच्या पॅनेलला शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे. तर सत्ताधारी असलेल्या भालके गटाचा श्री. विठ्ठल शेतकरी विकास पॅनल आहे. या पॅनेलला कपबशी हे चिन्ह मिळालं आहे.





विठ्ठल 100 टक्के पावणार, अभिजीत पाटलांचा विश्वास


या निवडणुकीच्या संदर्भात एबीपी माझा डीजिटलनं धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन आणि श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, या कारखान्याचे 25 हजार 392 सभासद आहेत. यापैकी मी 16 ते 17 हजार सभासदांच्या भेटी घेतल्या आहे. त्यांचा मला उत्तर प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या पॅनेलला जवळपास 11 ते 12 हजार मते मिळतील आमि आमचा विजय 100 टक्के होईल, विठ्ठल आम्हाला पावेल अशी खात्री अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर शेतकऱ्यांची आत्तापर्यंत राहिलेली थकीत बिले, कर्मचाऱ्यांच्या पगारी देऊनचं ऊसाची मोळी टाकणार असल्याचे पाटील यांनी सांगितलं. विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत, त्यामुळं ते आरोप करत आहेत. त्यांच्याकडे फक्त पुढारी आहेत, तर आमच्याकडे सभासद असल्याचे पाटील म्हणाले. रोंगे सर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सहकार्याचा मोटा फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




सभासदांचा चांगला प्रतिसाद, विजय आमचाच : अॅड. गणेश  पाटील 


सर्व सभासदांच्या गाठीभेटी आम्ही घेतल्या आहेत. कारखान्याच्या सभासदांचा आम्हाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळं आमच्या पॅनेलचा विजय निश्चित असल्याचे मत आण्णा भाऊ विकास शेतकरी पॅनेलचे अॅड. गणेश पाटील यांनी व्यक्त केले. 25 हजार मतदारांपैकी चांगल्या पद्धतीनं मते घेऊन विजयी होऊ, सभासदांचा कौल आमच्या बाजूनेच असल्याचे पाटील म्हणाले. विरोधक म्हणत आहेत की, आमच्या गटाच्या मताची विभागणी होणार, पण कशी विभागणी होणार हे त्यांनी सांगावे. कारण यापूर्वी अभिजीत पाटील यांचा कोणताही गट नव्हता. आमचे जरी दोन गट पडले असले तरी मते अभिजीत पाटील यांना मिळणार नाहीत असे पाटील यावेळी म्हणाले. त्यामुळं विजयाची आम्हाला खात्री असल्याचे गणेश पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, एबीपी माझा डीजीटलने सत्ताधारी असलेल्या भालके गटाशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 


दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूरममधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर चांगलेच आरोप प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तिन्ही पॅनेलनं विजयाचे दावे केले आहे. त्यामुळं यावेळी सभासद कोणाला कौल देणार आणि विठ्ठल कोणाला पावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.