सोलापूर :  मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena) आता मुखपत्र येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 'सामना' (Saamana) या मुखपत्राला 'धर्मवीर' (Dharmaveer) या शिवसेना शिंदे गटाच्या मुखपत्रातून उत्तर मिळणार आहे. उद्या (9 फेब्रुवारी) एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धर्मवीर या मुखपत्राची मुंबईत स्थापना होणार आहे. मासिक स्वरुपात धर्मवीर हे मुखपत्र 10 फेब्रुवारीपासून प्रसिद्ध होणार असल्याची माहिती अक्षय महाराज भोसले यांनी दिली आहे. 

Continues below advertisement


धर्मवीर मुखपत्राची संपादकपदाची जबाबदारी अक्षय महाराज भोसले यांच्याकडे


संजय राऊत यांच्या कार्यकारी संपादकपदी असणाऱ्या सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्राला आता शिंदेच्या धर्मवीर या मुखपत्रातून आव्हान दिले जाणार आहे. शिंदेच्या धर्मवीर या मुखपत्रातून पक्षाची धोरणे तसेच इतरही महत्वाचे निर्णय आणि भूमिका जाहीर होणार आहेत. या मुखपत्राची संपादक पदाची जबाबदारी अक्षय महाराज भोसले यांनी घेतली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या मुखपत्रातून आता थेट सामनामधील ठाकरे शैलीला आव्हान दिले जाणार असल्याचे अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.


शिवसेना ठाकरे गटाकडून सामना या मुखपत्रातून पक्षाची भूमिका मांडली जाते. सामनात अनेकवेळा शिवसेना शिंदे गटावर कडाडून प्रहार करण्यात येतो. त्यांच्या या टीकेला प्रतित्युत्तर देण्यासाठी आता शिवसेना शिंदे गटाकडून देखील धर्मवीर हे मुखपत्र चालवलं जाणार असल्याची माहिती अक्षय महाराज भोसले यांनी दिली आहे. सुरुवातीला धर्मवीर हे मुखपत्र मासिक स्वरुपात प्रसिद्ध केलं जाणार आहे. आता या मुखपत्राच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाची भूमिका देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप