सोलापूर : भाजपने आपल्याला एकटे पाडलं, विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी आता आणखी एक आरोप केला. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला. त्यामुळे सांगोल्यामध्ये (Sangola Election) आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिंदेंचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा शेकापच्या बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर आता नगरपालिकेच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर आरोप केला आहे.
Shahajibapu Patil On BJP : आपल्याला पाडण्यासाठी भाजपने काम केलं
लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही आपण प्रचार केला आणि भापजच्या उमेदवाराला 15 हजारांचे मताधिक्य दिलं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला.
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलं आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील हे नाराज आहेत.
Shahajibapu Patil Speech : कुत्री-मांजरं आपल्याला घाबरवत आहेत
भापजवर टीका करताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, "सांगोल्याची निवडणूक ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनवलं जात आहे, हेलिकॉप्टरमधून येऊन यांनी गुंडशाही सुरू केली आहे. भाजपने आपलं कंबरडं मोडलं. विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत मी इतकं प्रामाणिकपणे वागून ते असं का वागले?"
शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, "पण मी लढणारी औलाद आहे. पैशाच्या जीवावर तालुका विकत घेऊन जायचा नाद करू नका. मला महाराष्ट्र घाबरतो, आणि ही कुत्री मांजरं आता मला घाबरावयला लागली आहेत. या तालुक्यात दोन राजे... एक गणपतराव देशमुख आणि दुसरा शहाजीबापू. आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजनाचा अधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांना उरला नाही."
Eknath Shinde On Shahajibapu Patil : शहाजीबापू जखमी वाघ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सांगोल्याचा वाघ म्हणून शहाजी बापू ओळखले जातात. तो जखमी शेर आहे. 3 तारखेला फटाके तयार ठेवा. कोई माने या ना मानेच.. सांगोल्यात वन अँड ओन्ली आनंदा माने.
शहाजीबापू, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मागे हा एकनाथ शिंदे आहे. तुमचा कार्यक्रम कुणीही करू शकणार नाही. बापू हळवा आणि तळागाळातील कार्यकर्ता आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. बापूला तुम्ही किती वेळा फसवणार? एकदा, दोनदा... पण आता तुम्ही बापूला फसवू शकणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपला टोला लगावला.
ही बातमी वाचा: