Jaykumar Gore: शहाजी बापू यांनीच आम्हाला एकटं पाडलं आहे. सगळ्यात आधी नगराध्यक्ष आणि पॅनल जाहीर करून बसले. त्यांना थोडेच निवडून यायचं होतं, त्यांना जे साधायचे ते त्यांनी साधले अशा शब्दात आज सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची फिरकी घेतली. उद्या सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत असल्याबाबत छेडले असता आम्ही त्यांचे स्वागतच करतो असे सांगत बापूंना जे अपेक्षित आहे ते उद्या होईल, असाही टोला लगावला. शेकाप भाजपसोबत आल्यामुळे आम्हाला स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारासोबत काम करायची संधी मिळाल्याचे सांगत आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे मारुती आबा बनकर हे जनतेत किती लोकप्रिय आहेत हे आजच्या गर्दीवरून दिसून येत असल्याचे ही गोरी यांनी सांगितले.
शक्तीप्रदर्शनाने विशाल पदयात्रा काढण्यात आली
जयकुमार गोरे यांच्या हस्ते सांगोला शहरातून शक्ती प्रदर्शन करीत विशाल पदयात्रा काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार , बाळासाहेब एरंडे मालक, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुती आबा बनकर आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार हे या पदयात्र सामील झाले होते. शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या सर्व महात्म्यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेत पालकमंत्र्यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण केला. यानंतर सांगोल्याचे आराध्य दैवत असणाऱ्या अंबिका माता मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
'फडणवीसांनी दिलेला कोणता शब्द मोडला, हे स्पष्ट करावे'
दरम्यान, शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर एकाकी पाडल्याचा आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान गंभीर तब्येतीत असूनही त्यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना आपल्या तालुक्यात 15 हजार मतांचा आघाडी मिळवून दिली, मात्र त्याच्या बदल्यात त्यांना सांगोल्यात दुर्लक्षित केल्याची भावना शहाजी बापू पाटील यांनी बोलून दाखवली होती. नगरपालिका निवडणुकीत भाजपने त्यांचे कट्टर विरोधक दीपक साळुंखे (शेकाप) यांच्याशी आघाडी केल्याने त्यांची नाराजी आणखी वाढली आहे. फडणवीसांनी दिलेला कोणता शब्द मोडला, हे त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी बापूंनी केली होती. तीन महिने आजार लांबवत निवडणुकीला प्राधान्य दिल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून डॉक्टरही नाराज झाल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या