Ujani Dam : सध्या पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस (Pune Heay Rain) सुरु आहे. पुण्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जोरदार पाऊस हा सोलापूर जिल्ह्यासाठी चांगला मानला जातोय. कारण पुणे जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात (Ujani Dam) येत असतो. सध्या पुण्यात जोरदार पाऊस सुरु असून, उजनीत सकाळपासून 47000 क्यूसेक विसर्गाने पाणी येत आहे. थोड्या वेळात हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. तसेच पारगावमध्ये देखील 68000 क्युसेक विसर्गणे पाणी येत आहे. पुण्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने वरच्या धरणातूनही पाणी सोडणे सुरू झाले आहे. 


सध्या उजनी धरणात वजा 14 टक्के एवढे पाणी


उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळं पाणीपातळी वाढली आहे. धरणात 53 टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणात वजा 14 टक्के एवढे पाणी आहे. सध्याची स्थिती पाहता उद्या संध्यकाळपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. 


पुणे शहर आणि परिसरात पावसाचा हाहाकार


पुणे शहर (Pune Rain) परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला (Pune Rain) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुसळदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. शहराच्या सखल भागात पाणी साचून ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. एनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता शहरातील परिस्थिती लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालये वगळता इतरांनी कामकाज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


पुणेकरांनो सावधान! आज जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन