Solapur: एका हॉटेलमध्ये दारुड्यांनी बिल देण्याच्या वादातून चांगलाच राडा केल्याचा प्रकार समोर आलाय. दारूचे बिल देण्यावरून मंगळवारी रात्री सोलापुरच्या बार्शी तालुक्यात दारूच्या दुकानात हॉटेल मॅनेजरला या तळीरामांनी जबर मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोलापूरमधील बार्शी तालुक्यात मंगळवारी (23 जुलै) रोजी पावणे आठ वाजता घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून दारुड्यांनी बिलावरून वाद घालत हॉटेल मालकाला जबर मारहाण केली आहे. यात मारहाणीत हॉटेल मॅनेजर महेश अंधारे जखमी झाला आहे.


मारहाण करत मागितली खंडणी


दारूच्या बाटल्या डोक्यावर फेकून दारुड्यांनी बिलाच्या वादातून हॉटेल मालकाला फोडून काढलं आहे. यावर हॉटेल सुरु ठेवल्यास २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी चार जणांवर भारतिय न्याय संहितेच्या २०२३ अंतर्गत कलम १०९(१), ११५(२), ३२४(४), ३०८(३), ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. सागर ओहोळ, तथागत मस्के, निखिल ननवरे, समर्थ वस्ताद असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.


सीसीटीव्ही दृश्य समोर


बार्शीतील दारुच्या हॉटेलमध्ये २३ जुलै रोजी झालेल्या या मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात दोन तीन दारुड्यांनी बिलाच्या वादातून हॉटेल मॅनेजरला बाटल्या डोक्यात फोडत जबर मारहाण केली. त्यानंतर इतर दारुडेही या मारहाणीत मध्ये पडले. त्यांनीही मॅनेजरला दारुच्या बाटल्या फेकून मारत लाथाबुक्यांनी तुडवले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी ४ दारुड्यांवर गुन्हा दाखल केला असून हॉटेल बंद न ठेवल्यास २० हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.