Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University : सोमवारपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार आहेत. तर नियोजित वेळापत्रकानुसार  2 ते 4 फेब्रुवारी रोजी स्थगित झालेल्या परीक्षा नंतर पार पडतील, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. 


राज्यातील विद्यापीठ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून परीक्षा कामाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 2 फेब्रुवारीपासून स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 पासून नियोजित अंतिम वेळापत्रकानुसार सुरू होणार असल्याची माहिती डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-2022 च्या विद्यापीठ आयोजित परीक्षा 23 जानेवारी 2023 पासून सुरू झाल्या होत्या. मात्र महाविद्यालयीन आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलनामुळे 2 ते 4 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. आता सोमवारपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आधी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम वेळापत्रकानुसार ज्या-त्या दिवसाची परीक्षा सुरू करण्यात येत असल्याचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपूर यांनी काढले आहे. 


"आवश्यक ती उपाययोजना करुन परीक्षा ठरलेल्या वेळेवर पार पडतील. गरज पडल्यास पर्यायी उपाययोजना आखून विद्यापीठ वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात यावी. यासंबंधी पर्यायी परीक्षा कर्मचाऱ्यांचे मानधन परीक्षा नियमाप्रमाणे देण्यात येईल. विद्यापीठ वेळापत्रकानुसार 6 फेब्रुवारीपासून नियमितरित्या होणाऱ्या परीक्षांची माहिती संबंधित सर्व घटकांना कळविण्याची जबाबदारी ज्या त्या संबंधित शिक्षण संस्थाची राहील." असे आदेश  डॉ. शिवकुमार गणपूर यांनी काढले आहेत. 


2 ते 4 फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा नंतर होणार 


महाविद्यालयीन आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या बहिष्कार आंदोलनामुळे 2 ते 4 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याने आता त्या परीक्षा नंतर होणार आहेत. त्यासंदर्भात विद्यापीठ संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल व त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल, अशी माहिती देखील डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली आहे.


परीक्षेच्या कामाजावर बहिष्कार टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावा; शासनाचे आदेश 


कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील काही विद्यापीठांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदींनुसार ठरलेल्या वेळेत परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने आवश्यक ती उपाययोजना करुन परीक्षा ठरलेल्या वेळेवर पार पडतील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पर्यायी उपाययोजना आखण्यात यावी. तसेच संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी आंदोलन मागे घेण्याबाबात प्रवृत्त करावे. त्यानंतर देखील संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कार्यवाही का करु नये, तर याबाबत नोटीस बजावण्यात याव्यात आणि या संदर्भात विद्यापीठाने केलेली कार्यवाही वेळोवेळी शासनास कळवावी, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.


या मागण्यांसाठी आंदोलन 


सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा. सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा. सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.  2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा, या मागण्यांसाठी राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  2 फेब्रुवारी पासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.