Pandharpur News : विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असून आमच्यात कोणीही नाराज नसल्याचा दावा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी केला. आज (4 फेब्रुवारी) पंढरपूर (Pandharpur) येथे खाजगी दौऱ्यानिमित्त आले असता भुमरे एबीपी माझाशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे आरोप चुकीचे असून असे असते तर पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला नसता असे त्यांनी सांगितले. मंत्रिपद हे सर्वांनाच पाहिजे असते. मात्र ते सर्वांना मिळू शकत नसते हे वास्तव आहे. मात्र मंत्रिपदासाठी शिंदे गटात कोणीही नाराज नसल्याचा पुनरुच्चार भुमरे यांनी केला.


'कोणीही दावा केला तरी संभाजीनगरची जागा शिंदे गट लढवणार आणि जिंकणार'


विधानपरिषद निवडणूक निकालाचा कोणताही फटका आम्हाला बसला नसून आमची ताकद काय हे 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येऊन आम्ही दाखवून देणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. संभाजीनगर येथील लोकसभेची जागा ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची असून येथे कोणीही दावा केला तरी ही जागा शिंदे गट लढवणार आणि जिंकणार असे भुमरे यांनी सांगितले. पक्षाने आदेश दिला तर संभाजीनगर लोकसभा लढवण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.


औरंगाबादचा खासदार कोण यावरुन भुमरे आणि जलील यांच्यात कलगीतुरा


याआधी मागील महिन्यातच औरंगाबादचे खासदार कोण होणार यावरुन इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळला होता..
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच खासदार होईल, असा दावा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे. त्यास प्रत्युत्तर देत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीतही दोघांच्या भांडणाचा फायदा आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे रिंगणात कितीही आणि कोणीही उमेदवार येऊ द्या, पुढचा खासदार हा मीच असेन, असा प्रतिदावाच त्यांनी केला होता. 


आयफोन वापरण्याबाबत दानवेंनी सुरु केलेली चर्चा निरर्थक


वंचित बहुजन आघाडीसोबत उद्धव ठाकरे यांच्या युतीचा फटका ठाकरे गटाला बसणार असून त्यांच्यासोबत असणारी सर्व हिंदुत्ववादी मते बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे वळलेली दिसतील असा दावा त्यांनी केला. शिल्लक सेनेतील अनेक नेते सध्या शिंदे साहेबांच्या संपर्कात असून लवकरच यांचे प्रवेश झालेले दिसतील, असा टोलाही भुमरे यांनी लगावला. फोन टॅपिंग टाळण्यासाठी आयफोन वापरण्याबाबत अंबादास दानवे यांनी सुरु केलेली चर्चा ही निरर्थक असून फक्त प्रसिद्धीसाठी असली वक्तव्य करत असतात असा टोलाही त्यांनी दानवे यांना लगावला. 


Aurangabad News : उमेदवार कोणीही असो खासदार मीच; एमआयएम-शिंदे गटात रंगला कलगीतुरा