सोलापूर: वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या 'NEET' (neet) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये सोलापुरातल्या (Solapur) संजय गांधी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या अल्फीया पठाण या विद्यार्थीनीने घवघवीत यश संपादन केलंय. अल्फीया पठाण हिने नीट परीक्षेत 720 पैकी 617 गुण मिळवले. विशेष म्हणजे यासाठी तिने कोणतेही क्लासेस किंवा ट्युशन न लावता ही दैदिप्यमान कामगिरी करुन दाखवली. अल्फीयाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. तर, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना आर्थिक मदत देऊनही तिचा सन्मान केला जात आहे.  


डॉक्टर होणं हे गरिबाचं काम नाही, आजकाल शिक्षणाला भरपूर पैसा लागतो बाबा. शिक्षण गरिबाचं राहिलं नाही, मेडिकलसाठी लाखो, कोटी रुपये लागतात, अशा चर्चा सर्वसामान्यांमध्ये नेहमीच होत असतात. वैद्यकीय प्रवेशासाठी ज्यांची ऐपत आहे, तेच तयारी करतात असंही बोलतं जातं. मात्र, काही विद्यार्थी हे आपल्या गुणवत्ता आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर हा समज मोडून काढतात. ते विद्यार्थी लाखो गरिबांच्या कुटुंबात प्रेरणाज्योत बनून पुढे येतात. सोलापूरच्या झोडपट्टीत राहणारी अल्फीय पठाणची स्टोरी देखील अशीच प्रेरणादायी आहे. 


50 हजारांची मदत


सोलापुरातील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या अल्फीया पठाण या विद्यार्थीनीने नीट परीक्षेत उत्तुंग झेप घेतली. घरची परिस्थिती बेताची असताना अल्फीया पठाणने नीट परीक्षेत 720 पैकी 617 गुण मिळवले. तिची हीच यशोगाथा एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर अल्फीयाच्या यशाचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे. विविध संस्था, संघटनानी अल्फीया पठाणच्या यशाचे कौतुक केले. सोलापुराच्या एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी ही अल्फीया पठाणच्या यशाचे कौतुक करत तिचा सन्मान केला. शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी अल्फीयाच्या घरी जाऊन 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मुस्लिम समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, त्यासाठी समाजातर्फे आणि एमआयएम तर्फे सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्दही यावेळी एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी दिला.


आई-वडिलांच्या कष्टाचं चीज


अल्पसंख्यांक समाजात उच्च शिक्षणाचे प्रमाण हे कमी आहे. त्यात नशिबी आलेली गरिबी मुलांच्या शिक्षणात अडथळा ठरू नये, यासाठी वडिल मुस्तफा आणि समीना पठाण यांनी केलेले कष्ट नक्कीच कौतुकास्पद आहेत. प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घेत अल्फीया पठाणने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. अल्फीयाचे हे यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे, त्यामुळेच पाठीवर कौतुकाची थाप टाकताना तिच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीसाठीही काहीजण पुढे येत आहेत. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI