Shri Vitthal Rukmini Mandir, Pandharpur : अनेक आरोपांनी वादग्रस्त ठरलेली आणि 2 वर्षे मुदत संपूनही अजून कार्यरत असलेली विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती तातडीने बरखास्त करून त्यांची चौकशी सुरु करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा दोन दिवसांनी सोलापूरला येणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून राज्य सरकारचा निषेध करू असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी आज दिला . मंदिर समितीच्या बारखास्ती आणि चौकशीसाठी आज प्रभाकर देशमुख आणि ऍड दत्तात्रय खडतर यांनी नामदेव पायरीजवळ मंदिराला लोटांगण घालून प्रदक्षिणा करीत निषेध आंदोलन केले . गेले 17 दिवसापासून प्रभाकर देशमुख आणि खडतर याच मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करीत असून शासनाने त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष न दिल्याने देशमुख आज आक्रमक झाले. वारकऱ्यांच्या आधी नामदेव पायरीजवळ भजन करून मग मंदिर समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी इशारा देताना ही समिती तातडीने बरखास्त करून आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे .
खरेतर आज विठ्ठल मंदिर बडवे उत्पात यांच्या ताब्यातून मुक्त होऊन 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ भारत पाटणकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मुक्तिदिन साजरा केला होता. बडवे उत्पात गेले तरी आरोप सुरूच असल्याबाबत बोलताना आता दुहेरी लढाई लढावी लागणार असून मंदिरातील भ्रष्टाचाराबाबतही आता रस्त्यावर आणि न्यायालयात लढा देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. मंदिर अजून 75 टक्के मुक्त झाले असून जोपर्यंत देवाची आरती पुरुषसुक्त वर केली जाते तोपर्यंत जातिव्यवस्थेची उत्तरण संपणार नाही, असे सांगत देवाची ही आरती म्हणणे बंद करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय आता सुब्रमण्यम स्वामी पुन्हा एकदा मंदिर सरकारच्या ताब्यातून काढण्यासाठी उलटे चक्र फिरवत असून आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयात लढून त्यांचा पराभव करू असेही डॉ पाटणकर यांनी सांगितले.
एकाबाजूला प्रभाकर देशमुख यांचे मंदिर परिसरात आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल मुक्तिदिन यामुळे आज मंदिर परिसर गजबजून गेला होता. मात्र मंदिर समिती बारखास्ती आणि चौकशीसाठी प्रभाकर देशमुख यांनी पंतप्रधान मोदी याना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क बनले आहे.