पंढरपूर: पंढरपुरातील आषाढी यात्रा संपताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र विठ्ठलाच्या कृपेने खूप मोठा अनर्थ टळला असल्याचं समोर आलं आहे. दर्शन रांगेतील उड्डाणपुलात विद्युत करंट उतरून तीन कुत्र्यांना मात्र आपला जीव गमवावा लागला आहे. आषाढी यात्रा संपत आल्याने भाविकांची गर्दी कमी झाली असली तरी देखील अजूनही दर्शन रांग ही गोपाळपूर पत्रा शेडकडे जाणाऱ्या मार्गावर असते. याच दर्शन रांगेत पंचमुखी मारुती मंदिराच्या समोर असणाऱ्या उड्डाण पुलावर सायंकाळी कर्मचाऱ्यांच्या मूर्खपणामुळे वीज प्रवाह असलेली वायर पडली आणि विजेचा प्रवाह या उड्डाणपूल व शेजारील रांगेत उतरला.
विठ्ठलाच्या कृपेमुळे या भागातील दर्शन रांग थोडी पुढे गेली होती आणि यामुळे या उड्डाण पुलावर भाविक नव्हते. मात्र जेव्हा या उड्डाणपुलाला कुत्रे चिटकले आणि काही क्षणातच ते तडफडू लागले. त्याच्या पाठोपाठ इतर दोन कुत्रेही अशाच पद्धतीने विजेचा झटका लागून तडफडल्यावर परिसरातील नागरिकांना हा धक्कादायक प्रकार समजला आणि त्यांनी तात्काळ विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं. या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आधी हा विजेता प्रवाह खंडित केला आणि नंतर तुटलेल्या धोकादायक वायर बाजूला काढल्या. मात्र हा सर्व प्रकार मंदिराची दर्शन रांग बनविणाऱ्या एका मूर्ख कर्मचाऱ्यांमुळे घडल्याचे समोर आले आहे.
दर्शन रांगेत लावलेले स्पीकर सोडवताना त्याने हिसका देऊन वायर तोडली आणि ती वायर तशीच या उड्डाण पुलावर पडली आणि अडकली. आज पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनाची रांग या पुलाच्याही पुढे गेली असून काल सायंकाळी विठ्ठलाच्या कृपेने या ठिकाणी कोणताही भाविक रांगेत उभा नव्हता. अन्यथा संपूर्ण आषाढी यात्रा व्यवस्थित झाली असताना एक खूप मोठी दुर्घटना घडू शकली असती. आता या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या आणि भाविकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या सर्व प्रकारात दर्शन रांगेच्या ठेकेदाराचा गलथानपणा समोर आला असून देवाच्या कृपेने भाविक जरी या अनर्थापासून वाचले असले तरी तीन मुक्या जनावरांचा यात हकनाक बळी गेला आहे.
तीन कुत्र्यांचा निष्पाप बळी
कर्मचाऱ्यांच्या मूर्खपणामुळे वीज प्रवाह असलेली वायर पडली आणि विजेचा प्रवाह या उड्डाणपूल व शेजारील रांगेत उतरला. विठ्ठलाच्या कृपेमुळे या भागातील दर्शन रांग थोडी पुढे गेली होती आणि यामुळे या उड्डाण पुलावर भाविक नव्हते. मात्र जेव्हा या उड्डाणपुलाला कुत्रे चिटकले आणि काही क्षणातच ते तडफडू लागले. त्याच्या पाठोपाठ इतर दोन कुत्रेही अशाच पद्धतीने विजेचा झटका लागून तडफडल्यावर परिसरातील नागरिकांना हा धक्कादायक प्रकार समजला आणि त्यांनी तात्काळ विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं. या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आधी हा विजेता प्रवाह खंडित केला आणि नंतर तुटलेल्या धोकादायक वायर बाजूला काढल्या. या निष्पाप श्वानांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.