सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबविण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयाची खंडणी मागणाऱ्या किरण राज पुरुषोत्तम घोडके यास काल रात्री पोलिसांनी दहा लाख रुपये घेताना रंगेहात पकडला असून त्याच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात किरण राज घोडके हे गेल्या काही दिवसापासून आंदोलने करीत होते.
बदनामी थांबविण्यासाठी एक कोटी रुपयाची मागणी
घोडके यांनी कारखान्याचे कामगार आणि काही व्यापाऱ्यांना घेऊन पुणे येथील साखर आयुक्तालयासमोर देखील आंदोलन केले होते. यानंतर अभिजीत पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी आमची विनाकारण का बदनामी करतोस अशा पद्धतीने विचारणा केल्यावर घोडके यांनी ही बदनामी थांबविण्यासाठी एक कोटी रुपयाची मागणी केली होती. याबाबत आमदार अभिजीत पाटील यांनी आपण चुकीचे काही केले नसताना असे पैसे देणे योग्य नसून याबाबत पंढरपूर पोलिसात तक्रार देण्यास सरडे यांना सांगितले होते, त्यानुसार सरडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात घोडके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान काल रात्री घोडके यांना फोन करून सरडे यांनी शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये भेटण्यास बोलवले. त्यापूर्वी सरडे यांनी दहा लाख रुपयांच्या नोटा पोलीस आणि पंच यांना दाखविल्या. त्यानंतर पोलिसांनी दोन पंच यांना घेऊन या हॉटेल परिसरात सापळा रचला. रात्री साडेआठच्या दरम्यान घोडके पैसे नेण्यासाठी आला असता सरडे यांनी खून केली आणि लगेच पोलिसांनी घोडके यास दहा लाखाच्या रकमेसह ताब्यात घेतले. यानंतर रात्री उशिरा किरण राज घोडके यांच्यावर भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 नुसार खंडणी मागणे खंडणी घेणे आणि धमकावणे या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. आज आमदार अभिजीत पाटील यांना खंडणी मागणाऱ्या या किरण राज घोडके याला न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. काही दिवसापूर्वी आमदार अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ऑनलाइन मोठ्या रकमेची फसवणूक झाली होती. याबाबत त्यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातही आवाज उठवला होता. आता थेट त्यांना खंडणी साठी धमकावले जात असताना पोलिसांनी या तथाकथित कामगार नेत्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.