Pandharpur Vitthal Mandir :  विठुरायाच्या दर्शनासाठी ऊन वारा पाऊस याचा विचार न करता तासनतास दर्शन रांगेत उभारणाऱ्या हजारो गोरगरीब भाविकांना आपल्या लहानग्या मुलांसह आणि वृद्धांसह थांबावे लागत असताना विठ्ठल मंदिरात सध्या शेकडो भाविक व्हीआयपी आणि एजंटांच्या मार्फत पैसे देऊन झटपट व्हीआयपी दर्शन घेतात . हे भीषण वास्तव सध्या रोज समोर येत असल्याने विठुराया हा व्हीआयपी आणि काळाबाजार करणाऱ्या एजंटांच्या विळख्यात अडकला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ सर्वसामान्य भक्तांवर आलेली आहे. याचे कारण देखील तसेच असून काल पैसे घेऊन झटपट दर्शन देतो म्हणणाऱ्या दोन एजंटांना पकडण्यात आले. मात्र, अजूनही पोलिसात गुन्हा दाखल न झाल्याने यात मंदिराशी संबंधित कोण कोण सामील आहेत यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्या मंदिर प्रशासन नेहमीप्रमाणे गोलमाल उत्तरे देत असली तरी शहरात प्रवेश केल्यापासून शेकडो एजंट झटपट दर्शन देण्याचे उद्योग करीत असल्याचे भीषण वास्तव आहे. 


या सर्व प्रकारची सत्यता पडताळण्यासाठी 'एबीपी माझा'ने हे व्हीआयपी रजिस्टर पाहिले असता येथे केवळ कालच्या एका दिवसात 35 पाने भरून तथाकथित व्हीआयपी लोकांची यादी भरली होती. म्हणजेच कालच्या एका दिवसात जवळपास दीड ते दोन हजार भाविकांनी अशा पद्धतीने झटपट घुसखोरी केल्याचे उघड झाले. खरेतर गेल्या 18 दिवसांपासून विठ्ठलाच्या दर्शनाची रांग तब्बल गोपाळपूर पत्राशेड पर्यंत गेली असताना आणि भाविकांना दर्शनाला रोज 10 ते 12 तास लागत असताना अशा पद्धतीने व्हीआयपी दर्शन सुरु ठेवण्याचे कारण काय असा सवाल भाविक करीत आहेत. या दर्शनरांगेत फक्त आम्हीच का थांबायचे ही घुसखोरी का सुरु आहे असा सवाल भाविकांतून येत असताना मंदिर समिती आणि प्रशासन मात्र या व्हीआयपी दर्शनासाठी पूर्ण सहकार्य करताना दिसत आहे. काल दर्शनाला गेलेल्या या दीड हजार व्हीआयपीमध्ये खरे व्हीआयपी किती आणि एजंटांच्या माध्यमातून परीसर देऊन गेलेले किती याचे उत्तर शोधणे शासनाचे काम राहणार आहे. पण यासाठी शासनाची इच्छाशक्ती असेल तर गोरगरीब भाविकांना न्याय मिळू शकणार आहे. जे कालचे चित्र होते तेच रोज असते आणि यात पैसे देऊन किती जणांचे दर्शन झाले याचे उत्तर देखील विठ्ठलालाच माहित असे म्हणायची वेळ आली आहे.
 


व्हीआयपी कोण? याची व्याख्याच नाही


मंदिरात व्हीआयपी कोण याची व्याख्याच नसल्याने अधिकारी, कर्मचारी, मंदिर समिती सदस्य आणि अध्यक्ष म्हणतील ते व्हीआयपी ठरत असून याचाच फायदा एजंट घेत असतात. यात प्रामुख्याने शहरातील सर्व एजंटांनी यासाठी मंदिरातील आपले 'संबंध' सांभाळून ठेवले आहेत. रोज लाखो रुपयाचा देवाच्या दर्शनाचा काळाबाजार बेमालूमपणे सुरु आहे. या व्हीआयपी दर्शनाचा फक्त एजंट आणि त्यांना साथ देणारे मंदिरातील काही घटक यांचाच फायदा होत असल्याने जर व्हीआयपीने सोडायचेच असेल तर किमान इतर देवस्थानासारखे सशुल्क दर्शन सुरु करण्याची मागणी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी केली आहे. मंदिर सदस्यांना सदस्यपदी माणसे सोडायला ठेवले आहे का असा सवाल करीत घाडगे यांनी त्यांच्याच नावावर 16 लोकांना सोडल्याची नोंद पाहिल्यावर त्यांना झटका बसला. म्हणजेच कोणाचाही नावावर असे व्हीआयपी एजंटांच्या मार्फत जातात हे उघड झाल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. सशुल्क दर्शनाला विरोध करणारे वारकरी संप्रदायातील काही नेते या व्हीआयपी आणि एजंटगिरी बाबत का मूग गिळून गप्प आहेत असा सवाल देखील घाडगे यांनी केला आहे . 


 


दर्शनाचा काळाबाजार ही मोठी साखळी, व्हीआयपी दर्शनव्यवस्था बेकायदेशीर
 


पैसे घेऊन माणसे सोडल्याच्या आरोपावरून निलंबित केलेले मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव यांनी या सर्व दर्शन काळाबाजारात मंदिरातील अनेकजण सामील असल्याचा आरोप केला आहे. आपण व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करा म्हणून आवाज उठविल्यानेच आपला काटा काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सचिन अधटराव हे एकत्रित शिवसेनेचे अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्य होते. त्यांच्यांवर पैसे घेऊन भाविकाला दर्शनाला सोडल्याचा आरोप ठेवला होता. मात्र आपण एका शिवसैनिकाला दर्शनासाठी पस दिला आणि त्याने विकल्याने आपल्याला प्लॅन करीत अडकविले आणि मंदिरातील हा काळे धंदे उघड होऊ नये यासाठी बेकायदा निलंबित केल्याचा आरोप केला आहे. याविरोधात आपण न्यायालयात गेलो असलो तरी मंदिरातील व्हीआयपी च्या नावाखाली सुरु असलेली साखळी मोडण्याचा आपण प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. विठ्ठल मंदिर समिती कायद्यामध्ये व्हीआयपी दर्शन ही व्यवस्थाच नसल्याने सध्या सुरु असलेले व्हीआयपी दर्शन हे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसह सर्व ठिकाणी पत्रव्यवहार करून हे बेकायदेशीर सुरु असलेली आणि भाविकांना त्रासदायक असलेली व्यवस्था बंद करण्याची मागणी केल्याचे सांगितले . 


काल, बुधवारी सापडलेले दोन एजंटमध्ये एक बडवे आणि एक उत्पात असून अजूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. तर, शहरात प्रवेश केल्यापासून बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, हॉटेल, लॉजेस, धर्मशाळा अशा ठिकठिकाणी शेकडो एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. देवाचे झटपट दर्शन देण्यासाठी 500 रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत दर आकारले जातात. गर्दी वाढली की हाच दर प्रत्येक भाविकांसाठी आकाराला जातो. या एजंटांना मंदिर व्यवस्थेतील अनेक मंडळींची साथ असल्यानेच पैसे देऊन आणलेल्या भाविकाला कोणत्यातरी व्हीआयपीच्या नावावर सोडले जाते असे उघड आरोप होऊ लागले आहेत. एका बाजूला गोरगरीब भाविक तासनतास दर्शन रांगेत उभे असतात. तर, दुसरीकडे शेकडो भाविक रोज देवाचे झटपट दर्शन घेऊन निघूनही जातात. ही मोठी साखळी असून यात मंदिरातील आणि बाहेरील अनेक मंडळी सामील असल्याने काल सापडलेल्या दोन एजंटांची पोलिसांकडून कसून चौकशी झाली तर अनेकांची नवे बाहेर येतील अशी चर्चा सुरू आहे. 


सध्याच्या मंदिर समितीची मुदत संपून दोन वर्षे लोटली असून मंदिराची व्यवस्था पाहणारा व्यवस्थापक सर्व नियम डावलून गेल्या सहा वर्षांपासून एकाच जागेवर कसा याचाही शोध लावायचा प्रयत्न झाल्यास यातून अनेक गोष्टी समोर येतील. सध्याची मंदिर समिती तातडीने बरखास्त करून एखाद्या IAS दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या सर्व प्रकारची चौकशी केल्यास अनेक धक्कादायक खुलासे उघड होण्याची शक्यता आहे. मंदिरातील सर्व व्यवहारातून खूप मोठे गौप्यस्फोट बाहेर येणार असून देवाच्या दर्शनाचा काळाबाजार कायमचा संपून जाईल, असे भाविकांनी म्हटले आहे.  यासाठी शिंदे फडणवीस सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर देवाचे रांगेतून दर्शन घेणाऱ्या विठुराया पावला म्हणाले तर वावगे होणार नाही.