Pandharpur News : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज जयंती (Namdev Maharaj Jayanti) निमित्त पंढरपूर (Pandharpur) ते घुमान (Ghuman) या संत नामदेव महाराज रथ आणि सायकल यात्रेचा शुभारंभ पंढरपूर इथे कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी 4 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. तर या सायकल यात्रेचा समारोप 8 नोव्हेंबर रोजी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चंदीगड इथल्या राजभवनात करण्यात येणार आहे. भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी ही माहिती दिली.
भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद, श्री नामदेव दरबार कमिटी, घुमान आणि श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ही 2300 किलोमीटरची सायकल यात्रा 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2022 या दरम्यान काढण्यात येणार आहे.
सायकल यात्रेचा मार्ग
श्री क्षेत्र पंढरपूर, फलटण, सासवड, पुणे, आळंदी, देहू, नाशिक, त्र्यंबकेश्वर मार्गे ही सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यातून अमृतसर मार्गे घुमान असा 2300 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सोबत संत नामदेव महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांचा ग्रंथ, पादुका, भागवत धर्माची पताका आणि पालखी रथ असणार आहे.
कार्तिक शु्द्ध एकादशी संत नामदेव महाराज यांची 752 वी जयंती, संत ज्ञानेश्वर माऊलींचा 725 वा संजीवन समाधी सोहळा आणि गुरुनानक जयंती याचं औचित्य साधून संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर इथल्या जन्मस्थानावरुन या यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकल रायडिंग केलेल्या आणि 50 पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे 110 सायकलपटूंनी सहभाग नोंदवला आहे. ही रथ आणि सायकल यात्रा महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब राज्यातून मार्गक्रमण करणार आहे. राष्ट्रीय स्तरावर निघणारी ही पहिली आध्यात्मिक यात्रा असून या यात्रेद्वारे भागवत धर्माच्या शांती, समता आणि बंधूता या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाची बातमी