Currency Notes: सध्या चलनी नोटांवर कोणाचा फोटो असावा (Currency Notes Controversy) यावर जोरदार चर्चा झडत आहेत. या नोटांच्या मुद्यावरून वाद सुरू झाला असताना आता याबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी वक्तव्य केले आहे. नोटांवरील फोटोवरून देशभर वाद सुरु झाला असताना हा मोदी आणि भाजपचा ट्रॅप असल्याचे अंधारे यांनी म्हटले. या सापळ्यात अडकण्यापेक्षा देशाच्या चलनाची घसरलेली पत कशी सुधारेल याचे उत्तर मोदी आणि केजरीवाल यांना विचारावे असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.
सुषमा अंधारे यांनी म्हटले की, नोटेवर गणपती आणि सरस्वतीचा फोटो हवा हि केजरीवाल यांच्यासारख्या अधिकारी राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी करणे हे खरेच आश्चर्यकारक आहे. केजरीवाल यांनाही मोदी यांचीच हिंदुत्वाची लाईन पुढे ओढायची आहे का असा सवाल केला. कोणत्याही देशाच्या चलनी नोटांवर कोणाचा फोटो असावा याचा एक इतिहास असतो आणि त्याला अनुसरून हे फोटो असतात. आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असल्याने त्यांचे फोटो नोटेवर येतात . मात्र देवी देवतांचे फोटोचा आग्रह धरणारे आणि विरोध करणारे या दोघांनीही याचा धार्मिक अंगाने विचार न करता आर्थिक इतिहास पाहावा असा सल्लाही अंधारे यांनी दिला.
रुपया कसा वधारेल याकडे लक्ष द्या
नोटांवर कोणाचा फोटो यापेक्षा भारतीय चलनाची प्रतिष्ठा कशी सुधारेल याचा विचार महत्वाचा असल्याचे अंधारे यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष देशात धर्म धर्मात फूट पडण्याचे भाजपचे द्वेषमूलक राजकारण यशस्वी होईल असे सांगताना आपण यात फसता कामा नये असा सल्ला त्यांनी दिला. अशा प्रकारच्या वादात सर्व धर्म एकमेकात भांडत बसले तर देशापुढील सर्व महत्वाचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मागे राहतील. मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा वाद सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
मनमोहन सिंग यांच्या काळात देशाचा GDP 8 टक्क्यांपर्यंत गेला होता. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी हा विकास दर 10 टक्क्यांपर्यंत नेण्याची दर्पोक्ती केली होती. आता तोच GDP पावणेतीन टक्क्यांपेक्षा कमी कसा झाला या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सतत प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
हे तर प्रेमविवाहानंतर प्रेमभंग...
आमदार बच्चू कडू यांची वक्तव्ये म्हणजे आता शिंदे-फडणवीस सरकार आणि फुटलेले आमदार यांच्या प्रेमविवाहानंतर प्रेमभंग झाल्याचे दिसत आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याने फार लवकर सत्य बाहेर आले असल्याचे अंधारे यांनी सांगितले. बच्चू कडू आणि इतर आमदार हे हिंदुत्वाच्या किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होऊन गेले नव्हते तर सत्तेतील वरचे पद मिळविण्यासाठी गेले होते. हे सत्य आता लोकांसमोर येत असल्याचेही अंधारे यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: